सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
सांगली - समाजाला सात प्रकारच्या स्वास्थ्याची आवश्यकता आहे, यामध्ये शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य या वैयक्तिक पातळीवरील स्वास्थ्याची संकल्पना सर्वांनाच ठाऊक आहे. समाज म्हणून या जगामध्ये एकत्र राहत असताना, पूर्ण विश्व एक खेडं झालेले आहे. अशा स्थितीमध्ये अन्य तीन प्रकारचे स्वास्थ्य जरुरीचे बनलेले आहेत. यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य आणि पर्यावरणाचे स्वास्थ्य हेही तितकेच आवश्यक बनले असल्याचे प्रतिपादन सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी वैद्य मनोज पाटील यांनी केले.
येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कस्तुरबा ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली मध्ये शिक्षक व्यक्तिमत्व विकास शिबिर भाग एक व दोन याचा समारोप नुकताच संपन्न झाला. यावेळी वैद्य मनोज पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती भारतीय चोपडे यांनी भूषविलेले होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना वैद्य मनोज पाटील पुढे म्हणाले की, पर्यावरणाचे स्वास्थ्य राखण्यासाठी आपल्याला मूलभूत गरजांची संकल्पना बदलावी लागेल. हवा, पाणी आणि अन्न या आपल्या मूलभूत गरजा मानून त्याच्या संरक्षणाची सिद्धता आपल्याला करावी लागेल. त्याला अनुषंगिक जीवनशैलीचे परिवर्तन आपल्याला करावे लागेल.
सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी मानवा मानवातील संवाद आणि संबंध याचा विचार करावा लागेल. त्यासाठी सहजीवनाची मूल्ये आपल्याला वाढवावी लागतील. असे असे मत व्यक्त करून वैद्य मनोज पाटील म्हणाले की, वैयक्तिक स्वास्थ्यासाठी, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी बुध्दीपूर्वक म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून जगलं पाहिजे. तसेच अध्यात्म आपल्याला आनंद निर्माण करणारा अंतर्गत घटक जो आहे, तो जगता आला पाहिजे. आपल्याला अपेक्षित साध्य करण्यासाठी आपण जरी कष्ट करत असलो, तरी फळ मिळण्यासाठी प्रतीक्षा करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी. शारीरिक स्वास्थ्यासाठी आहार, निद्रा आणि व्यायाम हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. आहारासाठी चे सूत्र म्हणजे मातेनं बनवलेलं आणि मातीतून उगवलेलं खावं. जेवढे पचेल आणि जे पचेल तेवढेच खावं. जे खाल्लेले आहे ते पचवावं. यासाठीचे तीन सूत्रे वैद्य मनोज पाटील यांनी विशद केली, ती म्हणजे पचवण्यासाठी त्याला वेळ देणे, दुसरे आहारामध्ये समतोलपणा असावा, आणि आवश्यकता व्यायाम करणे. हा व्यायाम आपल्या शक्तीच्या निम्म्या प्रमाणात असावा असेही प्रतिपादन वैद्य मनोज पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. श्रीमती भारती चोपडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक कसा असावा, त्याच्याकडे कोणते गुण असावेत, याबद्दल खूप छान नियोजन केले तसेच छात्राध्यापिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात भित्तीपत्रक उद्घाटनाने झाले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते शिबिरातील हस्तलिखिताचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
छात्राध्यापिकांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. प्रियांका वठारे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय कु. अनघा चौगुले यांनी करून दिला. आभार कु. ऋतुजा घुमान्ना यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कॉलेजच्या प्राचार्य मा.सौ श्वेता चौगुले , विभाग प्रमुख मा.प्रा.सौ रत्नमाला आवटी (भाग २) व मा.प्रा.सौ पूजा पाटील ( भाग १) , मा.प्रा.श्री बाहुबली नोरजे, मा. प्रा.सौ. प्राची पाटील , शिबीर प्रमुख कु. श्वेता माळी व कु.पल्लवी शिरगुप्पे तसेच सर्व छात्राध्यापिका उपस्थित होत्या.