Sangli Samachar

The Janshakti News

जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले,'सांगली'च्या उलट-सुलट चर्चेत माझा काय संबंध...?



सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत कोणाला मिळेल, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अद्याप जागावाटप झालेले नसताना सांगलीची काँग्रेसची जागा काढण्यात माझा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील कॉंग्रेस नेते करत आहेत. याबाबतच्या बेजबाबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नाही, असा खुलासा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे. पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून पडद्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचा समाचार पक्षश्रेष्ठी घेतील. पण आता जनतेतून आवाज येत आहे. जनता सगळ्या डावांना ओळखून असल्याची टीका काँग्रेसवाले करत आहेत. अशा बेजाजबदारपणे केल्या जाणाऱ्या उलट-सुलट चर्चेशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.


मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन पाळणे पसंत केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. परंतू ते सध्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही जागावर शिवसेनेच्या गटाने दावा सांगितला आहे. परंतू सध्यस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेची एक जागा कमी होत असून कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे. परंतू सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.