yuva MAharashtra मनोज जरांगेंनी रामबाण अस्त्र बाहेर काढलेच, लोकसभेला मराठा व्होट बँकची ताकद दाखवणार

मनोज जरांगेंनी रामबाण अस्त्र बाहेर काढलेच, लोकसभेला मराठा व्होट बँकची ताकद दाखवणार



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
अंतरवाली सराटी - मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये बोलवलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्याने मते फुटतील, त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणी देऊ शकतो. आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकतो. जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपले मतं फुटतील. त्यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहे, आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही. आपला आरक्षण दिल्लीत नाहीच, असेही जरांगे म्हणाले आहेत. 

जिल्ह्यातून एकच अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा

तसेच मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. त्यामुळे तुमचा जर सर्वांचं मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वांना मान्य आहे का? याची चर्चा करावी. त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, राजकारण माझा मार्ग नसून, मला त्यात अडकवू नका असेही जरांगे म्हणाले आहेत. 


दुसरा पर्याय देखील सांगितला...

तसेच, दुसरा पर्याय असा आहे की, कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून लेखी लिहून घ्या की त्याचा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा राहील. पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याने जरांगे यांनी हा पर्याय सोडून द्या असे स्पष्ट केले.

राजकारणात मला जायचे नाही...

मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, हा निर्णय अडचणीचा होऊ शकतो असे त्यांना समजावून सांगितले आहे. तुमची राजकीय शक्ती दाखवा असे समाजाला सांगतिले आहे. अनेक उमेदवार देण्यापेक्षा एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणा असे सांगितले. फक्त मराठा समाजाचे उमेदवार दिले जाणार नाहीत, तर सर्वच जातीचे उमेदवार दिले जाणार आहेत. मी फक्त त्यांना पर्याय सांगितला आहे. मात्र, राजकारणात मला जायचे नाही, समाजाने सांगितले तरीही मी जाणार नाही असे जरांगे म्हणाले आहेत.