Sangli Samachar

The Janshakti News

जागावाटपात शिवसेना, राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी; महाविकास आघाडीत पाच जागांवरून तणाव



सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी महाविकास आघाडीतील जागावापाचा तिढा अजून सुटलेला नाही. सांगली, भिवंडी, रामटेक व मुंबईतील दोन जागांवरील शिवसेना ( ठाकरे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आपला दावा सोडायला तयार नसल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीतूनही जागावाटपाच्या वादावर तोडगा निघू शकला नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमकतेपुढे काँग्रेस नेते काहिसे हतबल झाले असल्याचे चित्र आहे. परंतु एक दोन दिवसात सगळे प्रश्न मिटतील व जागावाटपाची एकत्रित घोषणा केली जाईल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस व ठाकरे गटात सांगली मतदारसंघावरून तणाव निर्माण झाला आहे. सांगलीची जागा काँग्रेस सोडायला तयार नाही. तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिल्यामुळे सांगली शिवसेनेला हवी, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा पाहिजे, त्यासाठी सांगलीवरील दावा ते सोडायला तयार नाहीत. मुंबईतील उत्तर-मध्य व उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेसला सोडण्यात येणार आहेत व शिवसेना चार जागा लढविणार आहे. काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई या पैकी एक मतदारसंघ मागितला आहे. परंतु शिवसेना दक्षिण-मध्य मुंबई सोडायला तयार नाही. ईशान्य मुंबईच्या बदल्यात शिवेसना रामटेकवर दावा सांगत आहे. 


तीन मतदारसंघांवरून काँग्रेस व शिवेसना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भिवंडी, अमरावती व वर्धा मतदारसंघावरुन वाद सुरू झाला आहे. मात्र काँग्रेसने अमरावतीसाठी वर्धा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. परंतु भिवंडावरील दावा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे या दोन पक्षांमध्येही जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नसिम खान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.