Sangli Samachar

The Janshakti News

वसतिगृहातच स्वतःला पेटवून घेऊन विद्यार्थिनीने संपविले जीवन



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
पुणे - कात्रज भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत वडील बालाजी धोंडिबा साळुंके (वय ४९, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सतीश जाधव आणि मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका पुण्यातील कात्रज भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहातील कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश जाधव तिला मोबाईलवर सतत मेसेज पाठवून त्रास देत होता. त्यामुळे ती घाबरली होती. तसेच, वसतिगृहातील तिच्या खोलीत राहणारी मुस्कान तिला त्रास देत होती.

या त्रासाला कंटाळून रेणुकाने ७ मार्च रोजी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर भाजल्याने रेणुकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा १९ मार्च रोजी मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे करीत आहेत.