सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
मुंबई - सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, त्या बदल्यात कोल्हापूर सोडायला तयार आहोत, असा प्रस्ताव महाविकास आघाडीत चर्चेत आल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अस्वस्थ आहे. सन २०१९ ला काँग्रेसला पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते. तेव्हा वसंतदादांचा नातू विशाल पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून लढण्याची वेळ आली होती. आता पुन्हा शिवसेनेला मतदारसंघ गेल्यास काँग्रेसची फरफट होईल, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी या घडामोडीत 'मी कदापी काँग्रेस सोडणार नाही, अन्य कोणत्याही पक्षाकडून लढण्याचा प्रश्नच नाही. हा काँग्रेसचा मतदार संघ आहे. आमचे नेते आमदार विश्वजित कदम योग्य तो मार्ग काढून निर्णय घेतील', अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना या अचानक 'एंट्री'ने उकळ्या फुटू लागल्या आहेत. सांगली मागायची, असा मुद्दा आधीच चर्चेला आला होता आणि त्यामुळेच प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीत राहा, शिवसैनिकाला मैदानात उतरवायचे ठरले तर आपल्यातील एखाद्याला संधी मिळू शकते, असा दावा केला होता. शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सांगलीची जबाबदारी आहे आणि त्यांनी हा विषय रेटला आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनीही थेट लक्ष घातले आहे. त्यामुळे 'कोल्हापूरसाठी सांगलीचा हात काँग्रेस सोडणार का?' असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.
या घडामोडीत आमदार विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाऊ नये, यासाठी कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी सकाळपासूनच लोक संपर्क करीत आहेत. जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस तर्फे या हालचाली थांबवा, काँग्रेसची जिल्ह्यात मजबूत मोट बांधली गेली आहे, विजयाच्या संधी आहेत, त्या हिरावू नका, असा निरोप पोहोचविला आहे. विशाल पाटील यांनी आपली संपूर्ण मदार आता विश्वजित कदम यांच्या खांद्यावर असल्याचे सांगितले.
ना तुला, ना मला; देऊन टाका सेनेला
सांगली लोकसभा मतदारसंघातील काही खासगी सर्व्हेमधून काँग्रेसला विजयाच्या संधी असल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे या मतदारसंघातून विशाल पाटील यांनी तयारी सुरू केली. त्याचवेळी आमदार जयंत पाटील यांनी मुलगा प्रतीक पाटील याच्यासाठी चाचपणी केली. पण, मधेच शिवसेना उभी राहिली आहे. या स्थितीत 'ना तुला, ना मला; देऊन टाका शिवसेनेला,' अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.