सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई - महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी अशा 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी महाआघाडी आणि महायुती अशी मोठी लढत पहायला मिळणार आहे. पण, फुटीच्या वातावरणामुळे ही निवडणूक अधिक मनोरंजक बनणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीने गेल्यावेळी 41 जागा जिंकून आपली ताकद दाखविली होती. मात्र, आता राज्यातले मित्र आणि विरोधक बदलले आहेत.
34 लाख मतदार वाढले
2019 च्या निवडणुकीत भाजपने राज्यात सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अविभाजित शिवसेना 18 जागांसह आघाडीवर आहे. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने 4, काँग्रेस, AIMIM आणि अपक्ष यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली. राज्यात 100 वर्षांवरील 50,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. तर, एकूण 9.2 कोटी लोक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत 34 लाख मतदार वाढले आहेत.
विविध भागातील राजकीय परिस्थिती काय?
कोकण : मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई ईशान्य, मुंबई वायव्य, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग
महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याच प्रांताला कोकण असे म्हटले जाते. या किनारपट्टीच्या प्रदेशात देशाची व्यापारी राजधानी मुंबईचाही समावेश आहे. तर, शेजारील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हेही याच भागात येतात. मुंबई जिल्ह्यात 6 लोकसभा, ठाणे जिल्ह्यात 3, तर पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 1 जागा अशा मिळून 12 जागा आहेत. यातील भाजप आणि शिंदे गटाकडे 4 जागा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 1 तर शिवसेना ठाकरे गटाकडे 3 जागा आहेत.
पश्चिम महाराष्ट्र : पुणे, मावळ, शिरूर, माढा, बारामती, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले
राज्यातील सर्वात विकसित प्रदेशांपैकी असा हा प्रदेश आहे. माहिती तंत्रज्ञान केंद्रे, साखर कारखाने, इथेनॉल प्लांट आणि कृषी समृद्ध ‘रबन’ क्षेत्रे येथे आहेत. प्रदेशातील प्रबळ दावेदार असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात फूट पडल्याने आगामी निवडणुकीत नव्याने युती झाल्यामुळे उमेदवारांवर तसेच पक्षाच्या विचारसरणीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शरद पवार यांचा बारामती हा बहुचर्चित मतदारसंघ याच विभागात येत आहे. त्यामुळे येथे विशेष नजर असणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 5 जागा तर शिवसेना आणि शरद पवार प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशातून प्रत्येकी 3 जागा जिंकल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्र : नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, नंदुरबार, धुळे
द्राक्षे आणि कांद्याच्या प्रमुख स्त्रोतांसाठ हा प्रदेश ओळखला जातो. कृषी उत्पादनासाठी निर्यात-आयात धोरणांमध्ये बदल होत असल्याबद्दल हा विभाग असंतोषाचे केंद्र बनले आहे. या भागात आदिवासी आणि मागासवर्गीयांची मोठी लोकसंख्या आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने येथील सर्व 6 जागा जिंकल्या होत्या.
मराठवाडा : औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद
पावसाअभावी त्रस्त असलेला हा विभाग महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत बऱ्याच प्रमाण अविकसित राहिला आहे. पाच मुख्यमंत्री होऊनही या विभागाचा विकास झालेला नाही. त्यामुळे येथे बेरोजगारीची मोठी समस्या आहे. छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे औद्योगिक केंद्र सोडले तर उर्वरित भाग ग्रामीण आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. 2019 मध्ये भाजपने लोकसभेच्या 4 जागा जिंकल्या तर मित्रपक्ष शिवसेनेला 3 जागा मिळाल्या होत्या. तर, औरंगाबादची जागा एआयएमआयएमने जिंकली होती.
विदर्भ : अकोला, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, रामटेक, यवतमाळ, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि जंगलांनी वेढलेला राज्याच्या पूर्वेकडील प्रदेश. मात्र, शेतकरी आत्महत्या यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. गडचिरोली आणि इतर काही भागांमध्ये नक्षली कारवाया वाढल्या आहेत. यामुळे ही आणखी एक समस्या आहे. गेल्या निवडणुकीत विदर्भातील लोकसभेच्या 11 जागांपैकी भाजपने 5 आणि शिवसेनेने 3 तर काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.