सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नको त्या टीकाटिप्पणीच्या भाषेवरून विरोधकांनी त्यांना अनेकदा सुनावले आहे. शिवसेना फुटीपासून ठाकरेंची बाजू उजवी करणाऱ्या राऊतांना विरोधकांनी जशास तसे आणि ज्या-त्या क्षणी उत्तर दिले, तरीही राऊत हे कधी कुठे थांबले नाहीत. मात्र, आता याच राऊतांना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष बोलू लागलेत, राऊतांना सबुरीचा सल्ला देत आहेत. या आधी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून मित्रपक्षातील अनेक बड्या नेत्यांनी राऊतांना काय बोलू नये आणि काय बोलावे, हे शिकवण्याचाही प्रयत्न केला.
अशातच काँग्रेस नेते डॉ. विश्वजित कदमांनी तर राऊत 'मोठे' नाहीत हे 'ऑन कॅमेरा' सांगून त्यांनी राऊतांना निवडणुकीच्या तोंडावर तरी तोंड बंद ठेवण्याचा 'डोस'च दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर राऊतांनी केलेल्या टीकेचा डॉ. कदमांनी टायमिंग साधून धारधार शब्दांनी राऊतांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आघाडीतील राऊतांसारख्या आक्रमक नेत्याला कदम यांनी तशाच 'स्टाईल'मध्ये उत्तर देऊन काँग्रेस आणि नाना पटोले यांना कमी समजलात तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, हेच कदमांनी आता दाखवून दिले आहे. एरवी, विरोधकांना अंगावर घेणाऱ्या राऊतांना आता डॉक्टर कदमांचा डोस पचनी पाडून घ्यावावाच लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला सारुन एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील जागावाटपाची चर्चा सुरू आहे. कोणती जागा कोणाला? याबाबत आघाडीत अद्याप एकमत झालेने नाही. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने मात्र सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेवर माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम संतापले आहेत. जागावाटपाचे सूत्र निश्चित नसतानाही शिवसेनेने सांगलीचा उमेदवार का ठरविला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय राऊतांच्या सततच्या काँग्रेसविरोधी वक्तव्याचा समाचारदेखील कदमांनी घेतला आहे.
डॉ. विश्वजित कदम कडाडले
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणाचा उमेदवार द्यायचा यासाठी आघाडीत चर्चा सुरु आहेत. मात्र, काही मतदारसंघ असे आहेत ज्यामुळे मित्र पक्षांमध्येच वाद सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातील एक मतदारसंघ आहे सांगलीचा. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु असून उभय पक्षातील नेते या जागेवर दावा करत आहेत. याच जागेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी पटोले यांच्यावर टीका केली होती. "नाना पटोले यांनी संयमाने बोलावं कुणाला भाजपला मदत करुन काही साध्य करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे." अशी टीका नाव न घेता राऊतांनी केली होती. राऊतांच्या याच टिकेवर आता काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसाहेब राज्याचे मोठे नेते आहेत, त्यांनी संयमाने बोलावं हे संजय राऊतांनी सांगू नये. नाना पटोलेंनी कसं बोलावं आणि काय बोलावं हे ते ठरवतील. गरज पडल्यास त्यांना मल्लिकार्जुन खर्गे आणि राहूल गांधी सांगतील, इतर कोणीही सांगू नये." तसेच शांत आणि सयंमी पद्धतीने राजकारण करणं हे माझ्या आई-वडिलांचे आणि काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. शांतपणाने राजकारण करणं म्हणजे दुबळेपणा नव्हे. ज्यावेळी शेतकऱ्यांचा, पक्षाचा आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, त्यावेळी मी रिंगणात येणारच, असंही विश्वजित कदमांनी राऊतांना सुनावलं.