सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
मिरज - मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतका निधी देण्यात आला आहे. यामधून सुसज्ज, देखणे व मिरज शहराच्या वैभवात भर पडेल असे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानक तयार होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मिरज (ग्रामीण) बसस्थानक बांधकामाचे भुमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, माजी महापौर संगीता खोत, परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विभागीय अभियंता सुशांत पाटील, मिरज आगार व्यवस्थापक श्रीमती किरगत, धनंजय कुलकर्णी, विठ्ठल खोत, उमेश हारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज ग्रामीण बसस्थानकाची 1983 साली स्थापना झाली होती. यामध्ये 15 फलाट व इतर सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामीण भागातून पूरक रेल्वे सेवा मिरज शहरामध्ये जोडली गेली असल्याने तसेच मिरज शहर हे वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच कर्नाटकमधूनही प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सद्याचे मिरज ग्रामीण बसस्थानक अपुरे पडत आहे. कर्मचारी, प्रवाशी यांनाही अडचण होत आहे. त्यासाठी या बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक होते. मिरज शहर व ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 37 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये मिरज ग्रामीण बसस्थानकासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आली असून त्याच्या कामाची सुरवात करण्यात येत आहे. मिरज येथील शहरी बस स्थानकही लवकरच सुसज्ज करण्यात येईल.
बसस्थानकाचे तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी संबधितांना दिले. तसेचन काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिरज ग्रामीण नव्याने बांधण्यात येणाऱ्या मिरज ग्रामीण बसस्थानकामध्ये तळमजला व पहिला मजला असे एकूण 1 हजार 965 चौ.मी. चे बांधीव क्षेत्रफळ आहे. यामध्ये तळमजल्यात 18 फलाट, सुलभ शौचालय, प्रतिक्षालय, वाहतूक निरीक्षक, पार्सल ऑफीस, जेनेरिक मेडिकल, आरक्षण, हिरकणी कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, महिला विश्रांतीगृह, उपहारगृह, दुकान गाळे इत्यादीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यामध्ये चालक-वाहक विश्रांतीगृह, लेखा शाखा, तिकीट व रोकड शाखा, प्रसाधनगृह तसेच पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, ट्रीमिक्स पेव्हमेंट, पेव्हर ब्लॉक पार्किंगकरिता, आर.सी.सी. स्ट्रॉम वॉटर ड्रेन, संरक्षक भिंत, लँडस्केप, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामाची अंदाजित रक्कम 13 कोटी 96 लाख 95 हजार 797 रूपये इतकी असल्याचे यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता सुशांत पाटील यांनी बसस्थानकाबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रतिदिन प्रवासी संख्या सुमारे 25 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्याच्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे आधुनिकीकरण गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पाठपुरावा व विशेष प्रयत्नांमुळे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानकाचे नव्याने बांधकाम होत असल्याचे ते म्हणाले. आभार विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी मानले. कार्यक्रमास परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.