Sangli Samachar

The Janshakti News

सांगली' सोडू नका! विश्वजित कदम घालणार 'दिल्ली'ला साकडे




सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
सांगली - महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणार आहेत. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ सोडू नये, असे साकडे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना घालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला आणि सांगलीची जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. जागावाटपाच्या तिढ्याबाबत दोन्ही जिल्ह्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली लोकसभेच्या जागेबाबत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची आमदार विश्‍वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेतली. सांगलीत विजयाची खात्री असताना ती का पणाला लावत आहात? असा सवाल उपस्थित केला होता, त्यानंतरही राज्यस्तरावर प्रश्न सुटलेला नाही. शिवसेनेने (उबाठा) सांगलीची जागा मागितली असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, पण ही जागा देण्यास नकार देण्यात आला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. या उलट शिवसेनेची ताकद कमी आहे. आयात करून घेतलेले उमेदवार या मतदारसंघात लोक स्वीकारणार नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जर ही जागा शिवसेनेला (उबाठा) ला सोडली तर 2009 मध्ये जत विधानसभा मतदारसंघात जो पॅटर्न राबवला होता, तोच पॅटर्न काँग्रेस (Congress) विसर्जित करून राबवू, असा इशारादेखील सावंत यांनी दिला आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हक्काची जागा आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली होती. काँग्रेस नेते विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर लढावे लागले होते. मात्र, ती चूक टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सांगली मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे. मतदारसंघ काँग्रेसकडून सुटणार असल्याच्या चर्चेने जिल्ह्यात नाराजी वाढत चालली आहे. याबाबतची गंभीर दखल घेत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न न सुटल्यास खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून हा विषय मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे जिल्ह्यातील काँग्रेस नेते सांगत आहेत. काँग्रेसला सध्या अत्यंत चांगले वातावरण असताना उलटसुलट बातम्यांनी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवर तोडगा निघणार का? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.