सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
सांगली - मतदारसंघात नाराजी आहे, अंतर्गत विरोध आहे, लोकसभेत आवाज उठवत नाहीत, अशा विरोधी घोषणांच्या गदारोळात विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली. वास्तविक अशा आरोपांच्या फैरी झडत असतानाही संजय काकांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि मतदारसंघात सुरू असलेला प्रचाराचा धडाका पाहता, आपल्यालाच उमेदवारी मिळणार हा विश्वास त्यांना होता. आणि तो महायुतीच्या राज्य व केंद्र पातळीवरील पक्षश्रेष्ठींनी सार्थही ठरविला. अर्थात यामागे मतदार संघात संजय काकांनी उभारलेले नेटवर्क आणि राज्य व केंद्रीय पातळीवरील त्यांचे मधुर संबंध हेच कारणीभूत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील ठाकरे गटाच्या पै. चंद्रहार पाटील यांनी जोरदार हुंकार भरला आहे. मुंबईत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधले, पक्षश्रेष्ठींना विजयाची खात्री देऊन सांगलीकडे कुच केले. काल सांगलीत त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा दंड थोपटले. यापूर्वी त्यांनी मतदार संघातील अनेक गावात संपर्क दौरा पूर्ण केला आहे. लवकरच मतदारसंघात त्यांचा गाड्यांचा ताफा धुरळा उडवणार असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आघाडीत मात्र अजूनही आपल्यालाच उमेदवारी मिळणार हा विश्वास दिला जात आहे. काँग्रेसच्या स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रभारींना भेटून विशाल पाटील हेच कसे योग्य आहेत ? त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, हे पटवून दिले आहे. सध्या न्याय यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात असलेल्या राहुल गांधींना ही बाजू कितपत पटवून देण्यात यश येते, गांधी घराण्याशी दादा घराण्याचे असलेले संबंध कितपत उपयोगी पडतात. आणि महाआघाडीच्या फायनल बैठकीत राज्य पातळीवरील नेतृत्व सांगलीची जागा राखण्यात कितपत यशस्वी होते यावर विशाल पाटलांची उमेदवारी अवलंबून आहे.
2019 च्या निवडणुकीत त्यांना का पराभव पत्करावा लागला हे उघड गुपित आहे. आताही विशाल पाटलांचा पत्ता कट करण्याचा डाव कोण खेळतो आहे हेही सर्वश्रुत आहे. मात्र सांगलीची जागा विशाल पाटलांनाच मिळावी, हा नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आग्रह पक्षश्रेष्ठींच्या व आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या किती पचनी पडतो, यावर सांगली लोकसभेच्या मैदानात खा. संजय पाटलांच्या समोर कोण पैलवान उभा ठाकणार ? आणि डाव प्रति डावावर कोण विजयी ठरणार ? हे येणारा काळच ठरवेल.