सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
मुंबई - आता बहुतांश कामं ऑनलाइन करणं शक्य झाल्यानं साहजिकच स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे; पण हॅकर्स याकडे संधी म्हणून पाहताना दिसतात. ते वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून लोकांची फसवणूक करत असल्याची अनेक प्रकरणं सातत्यानं उघडकीस येतात. सध्या सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी दिलेला सल्ला चर्चेत आहे. या तज्ज्ञांनी अँड्रॉइड युझर्सना एक इशारा दिला आहे. एका नवा मालवेअर सापडला असून, तो युझर्ससाठी अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याचं या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. सुरक्षाविषयक तज्ज्ञांनी अँड्रॉइड युझर्सना नेमका काय इशारा दिलाय, ते सविस्तर जाणून घेऊया.
देशात अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्सची संख्या आता कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. सॅमसंगपासून ते विवोपर्यंत अनेक कंपन्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करत नवीन हँडसेट तयार करतात. आता अशा कोट्यवधी स्मार्टफोन युझर्सना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. अँड्रॉइड एक्सलोडर नावाचा नवीन मालवेअर आढळल्याचं सुरक्षातज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. हा मालवेअर स्मार्टफोनमधली युझरची सर्व माहिती जमा करतो. तो एसएमएससुद्धा अॅक्सेस करतो आणि स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडला काम करतो. हा मालवेअर स्मार्टफोन युझर्ससाठी धोकादायक ठरू शकतो. हे वृत्त ब्लीपिंग कम्प्यूटरने McAfee च्या हवाल्यानं दिलं आहे.
दरम्यान, McAfee ने यापूर्वीच या थ्रेडबाबत गुगलला माहिती दिली आहे. त्यानंतर कंपनीनं हा मालवेअर काढून टाकला आहे; पण जी अॅप्स थर्ड पार्टी किंवा बाहेरची आहेत, त्यावर गुगल नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे युझर्सनी 'प्ले प्रोटेक्ट' एनेबल करावं. यामुळे युझर्स अशा धोक्यांपासून सुरक्षित राहतील, असा सल्ला गुगलने दिला आहे.
अँड्रॉइड एक्सलोडर मालवेअर अगदी सहजपणे डिव्हाइसवर हल्ला करतो. यात एका इन्फेक्टेड वेबसाइट यूआरएलसह एसएमएस पाठवला जातो. या मेसेजमुळे फोनमध्ये मॅलिशियस अॅपसाठी मार्ग खुला होतो. या लिंकवर क्लिक केल्यावर हँडसेटमध्ये एपीके फाइल इन्स्टॉल होते. मेसेजवर क्लिक करताच ती आपलं काम सुरू करते. ही लिंक साइडलोडिंग तंत्राचा वापर करून इतर स्रोतातून एक अॅप इन्स्टॉल करते; मात्र ही गोष्ट युझरला माहिती नसते. हा मालवेअर युजर्सच्या नकळत आपलं काम करत असतो. हा मालवेअर केवल एसएमएस अॅक्सेस मिळवत नाही तर अॅप्स ट्रॅकिंगसुद्धा करतो. या टूलचा वापर करून हॅकर्स तुमची फसवणूक करतात. त्यामुळे अँड्रॉइड युझर्सनी सावध राहावं असा सल्ला दिला गेला आहे.