सांगली समाचार - दि. १ मार्च २०२४
सांगली - सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेचा २०२४-२५ चा ८२३.२८ कोटी रुपये जमेचा व ८२२.९९ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी गुरुवारी प्रशासकीय महासभेत मंजूर केला. अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ, करवाढ केलेली नाही. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यावर भर दिला आहे. विस्तारित भागाचा सिटी सर्व्हे तसेच पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रशासकांनी सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. प्रशासकीय महासभेत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त पंडित पाटील तसेच नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.
ई-बससेवा, पर्यावरणपूरक अंत्यविधी (गोकाष्ठ, शेणीचा वापर), अमरधाम येथे अंत्यसंस्कार कट्टे वाढविण्यासाठी तरतूद, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वैद्यकीय उपकरणांसाठी तरतूद, श्वान निर्बीजीकरण व डॉग शेल्टर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, खेळाडू दत्तक योजना राबविणे, तृतीयपंथीयांसाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना, पर्यावरण अहवाल तयार करणे, ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण, सांगलीतील हळद, बेदाणा, भडंग आदी उत्पादनांचे जीओ टॅगिंग करणे, रणगाडा आणि शौर्य स्मारक उभारणे, महापुरुषांचे पुतळे बांधणे आणि परिसर विकास करणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे, प्रदर्शन केंद्र उभारणे, धुळगाव योजना सहकारी तत्त्वावर पाणी उपसा सोसायटी, पाणी पुरवठा विभागाकडील ५८ विद्युत पंपांचे ऑडिट, राष्ट्रीय नदी कृती योजनेसाठी महाापलिका हिस्सा देणे, माधवनगर रेल्वे ब्रीज अंडरपाससाठी निधी, पत्रकार भवन उभारणे, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी क्लब उभारणे आदी प्रमुख योजना आणि संकल्प यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे.
महापालिका क्षेत्रातील गावठाण भाग वगळता इतर विस्तारित व गुंठेवारी भागाचे अच्द्याप सिटी सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे बांधकाम परवाने व अन्य कामांसाठी अडचणी निर्माण होतात. यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून विस्तारित व गुंठेवारी भागाचे सिटी सर्वेक्षण होईल. त्याची सनद नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेचे ५६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र १९८४ साली बांधलेले आहे. ते आता कालबाह्य झाले आहे. या केंद्राची दुरुस्ती व नवीन ७६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ यासाठी २.६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रासाठीही पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा केला जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली.
खेळाडू दत्तक योजना राबविणार
महापालिका खेळाडू दत्तक योजना राबविणार आहे. खेळाडूंना कर्मचारी म्हणून थेट कामावर न घेता त्यांना खेळासाठी अत्यावश्यक साहित्य, मदत पुरविण्यात येणार आहे. या मदतीतून संबंधित खेळाडूंना राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. क्रीडा स्पर्धा आयोजित करून गुणी व गरजू खेळाडूंना दत्तक घेतले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली.
पर्यावरण अहवाल तयार करणार
शहराचा विकास होत असताना पर्यावरणावरही परिणाम होत असतो. देशातील १८९ हवा प्रदूषित शहरांमध्ये सांगलीचा समावेश आहे. शहरात हवा प्रदूषण, नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. अन्य प्रकारचेही प्रदूषण होत असते. मात्र यावर उपाययोजमा करण्यासाठी महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करणे गरजेचे आहे. यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
तृतीयपंथियांसाठी सक्षमीकरण योजना
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पात तृतीयपंधियांसाठी योजना आणली आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. तृतीयपंथियांना स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. यासाठी पाच लाखांची टोकन तरतूद केली आहे. आवश्यकतेनुसार वाढीव तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली.