सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
मुंबई - होळीच्या उत्सवात प्रत्येक जण वेगवेगळ्या रंगांत न्हावून निघाला आहे. कुणी लाल, कुणी पिवळा, कुणी गुलाबी, कुणी हिरवा... एक ना दोन किती तरी रंग... पण एक असा रंग जो या रंगांपेक्षा निराळा आहे. जो सोन्यापेक्षाही महाग आहे. जगातील सर्वात महाग असा हा रंग. ज्याच्या एक ग्रॅमची किंमतच तब्बल 83 हजार रुपये आहे. बाजारात बरेच रंग उपलब्ध आहेत. महाग रंग म्हटलं की हर्बल किंवा ऑर्गेनिक कलर. पण महागात महाग रंग कोणता असेल याचा तुम्ही कधी विचार केला होता का? हा रंग इतका महाग आहे की सामान्य लोक सोडा श्रीमंतही हा रंग खरेदी करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील.
कोणता आहे हा रंग?
जगातील सर्वात महाग रंगद्रव्याबद्दल बोललो तर ते लॅपिस लाझुली आहे. कलरमॅटर्सच्या मते, हा सुंदर निळा रंग एकेकाळी इतका दुर्मिळ होता की त्याची किंमत अनेकदा सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त होती. प्राचीन काळी प्रसिद्ध चित्रकार त्यांच्या चित्रांसाठी हा रंग वापरत असत.
काय आहे लॅपिस लाझुली?
लॅपिस लाझुली हा निळ्या रंगाचा दगड आहे,जो अफगाणिस्तानच्या पर्वतांमधून काढला जातो. प्राचीन भारतीय संस्कृतीत ओळखल्या गेलेल्या नऊ रत्नांपैकी हे एक होतं, जे लाजवर्ड किंवा राजावर्त म्हणून ओळखलं जात असे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त एक ग्रॅम लॅपिस लाजुलीची किंमत 83 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. या रत्नाचं शास्त्रात खूप महत्त्व आहे. रत्न शास्त्रानुसार कुंडलीत शनी उच्च स्थानात असताना लाजवर्त रत्न धारण करावं. मकर आणि कुंभ राशीचे लोकदेखील लाजवार्ता घालू शकतात.
लॅपिस लाझुली रंग महाग का?
आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा रंग इतका दुर्मिळ आणि महाग का आहे? तर हा रंग लॅपिस लाझुली बारीक करून बनवला जातो. लॅपिस लाझुली हे दुर्मिळतेमुळे ते फारच कमी वापरलं गेलं. हे बहुतेक राजघराण्यांमध्ये विशेष कार्यक्रमांसाठी तयार केलं गेलं होतं. याचा उपयोग धार्मिक कलाकृती आणि देवतांची चित्रं बनवण्यासाठी केला जात असे. ते तयार करण्यासाठी, पूर्वीच्या रत्नांची खाण केली गेली. मग ते बारीक करण्याची प्रक्रिया खूपच कठीण होती. हे इतकं दुर्मिळ होतं की शिपमेंट येण्यासाठी कलाकारांना कित्येक महिने वाट पाहावी लागायची. आजही मूळ लॅपिस लाझुली शोधणं कठीण आहे. त्यामुळे त्याचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. नंतर 1820 च्या उत्तरार्धात, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये सिंथेटिक अल्ट्रामॅरिनचे उत्पादन सुरू झालं, जे यालाच एक पर्याय मानलं गेलंय.