Sangli Samachar

The Janshakti News

भारत करणार समुद्रमंथन, 6 किलोमीटर खोल मिशन समुद्रयान



सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
वी दिल्ली - चंद्रावरील मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारताने आणखी एका मोठी मोहीम हाती घेतली आहे. भारत आता खोल समुद्राचा अभ्यास करणार आहे. याची सुरवात 2021 पासून सुरु आहे. मात्र, ही मोहीम प्रत्यक्षामध्ये 2025 च्या अखेरीस पूर्णत्वास येणार आहे. भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 2025 च्या अखेरीस भारताने आपल्या समुद्रयानमध्ये 6 किलोमीटर खोल समुद्राचा अभ्यास करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ पाठविण्याची तयारी केली आहे.

मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मत्स्या 6000 या भारतीय पाणबुडीच्या मदतीने मानव समुद्राखाली 6,000 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतो. या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी देखील केली जाईल. समुद्रयान हे समुद्राच्या आत 6 किलोमीटर खोलीपर्यंत जाईल. जिथे प्रकाशही पोहोचू शकत नाही त्याठिकाणी हे समुद्रयान पोहोचणार आहे. आमच्या मत्स्या (Matsya 6000) चा संबंध आहे. हे यंत्र मानवांना तेथपर्यंत घेऊन जाईल असे त्यांनी सांगितले. समुद्रयान प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस शास्त्रज्ञ पहिली उथळ पाण्याची चाचणी घेण्यास सक्षम असतील. समुद्रयान किंवा खोल महासागर मोहीम ही 2021 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. या मोहिमेमध्ये मत्स्य 6000 चा वापर करून मध्य हिंद महासागरातील समुद्राच्या तळापर्यंत 6,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी एक क्रू मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेत तीन जणांचा समावेश असेल असे त्याचे डिझाइन तयार केले आहे अशी माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.


अमेरिका, रशिया आणि चीनच्या श्रेणीत भारत येणार

पाणबुडी वैज्ञानिक सेन्सर्स आणि उपकरणांच्या संचने सुसज्ज असणार आहे. 12 तास इतकी या ऑपरेशनची क्षमता असेल. आपत्कालीन परिस्थितीत याची क्षमता 96 तासांपर्यंत वाढवता येणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जपान यासारख्या देशांनी खोल समुद्रातील क्रू मिशन यशस्वी केले आहे. या मोहिमेत आपले कौशल्य आणि क्षमता दाखवून भारत या देशांच्या रांगेत सामील होण्यास तयार झाला आहे.