yuva MAharashtra लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा 4M' फॉर्म्युला !

लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा 4M' फॉर्म्युला !



सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अखेर लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने निवडणूक आयोगासमोर असणार आहेत. 

निवडणूक आयोगासमोर चार मोठी आव्हाने

निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार M चा उल्लेख केला. यातील पहिला M म्हणजे मसल पॉवर, दुसरा M म्हणजे मनी पॉवर, तिसरा M म्हणजे मिसइन्फॉर्मेशन, चौथा आणि महत्त्वाचे आव्हान म्हणजे हिंसाचार. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मसल पावर, मनी पावर, गैरप्रकार आणि हिंसा रोखण्याचं मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत.


हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा प्लॅन

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मसल पावर, मनी पावर, गैरप्रकार आणि हिंसा रोखण्याचं मोठे आव्हान असणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसाचार रोखण्यासाठी कोणतेही स्थान नसेल. जर हिंसाचार झाला तर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच हिंसाचार रोखण्यासाठी अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत आम्ही कोणत्याही पद्धतीच्या बळाचा आणि पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे कुठेही हिंसा झाल्यास अजिबात दया दाखवली जाणार नाही. निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. तिथे एकूण पाच feed येतील. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत. ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

पैशाचा गैरवापर रोखणार

निवडणुकीदरम्यान काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशाचा गैरवापर केला जातो. हे रोखण्यासाठी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत आम्ही 3400 कोटी रुपये जप्त केले होते. कुठेही कोणत्याही प्रकारच्या वस्तू या फुकट वाटल्या जाणार असतील तर त्या रोखण्यासाठीचे आदेश आम्ही यंत्रणांना दिले आहेत.

अफवा पसरू देणार नाही

तसेच मतदानाच्या काळात सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरल्या जातात. त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर कोणतीही सोशल मीडियावरील पोस्ट आक्षेपार्ह असेल किंवा त्यामुळे निवडणुकांचं वातावरण खराब होण्याची शक्यता असेल, तर ती पोस्ट काढून टाकण्याचे अधिकार आम्ही राज्य सरकारला दिले आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

कोणतीही चुकीची माहिती रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. आयटी कायद्याच्या कलम 69 आणि 73 अंतर्गत सर्व अधिकृत अधिकाऱ्यांना सोशल मीडियावरुन पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणी खोट्या पोस्ट टाकल्या तर अशा लोकांवर त्वरित कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाकडून Myth vs Reality अशाप्रकारचा एक उपक्रम सुरु केला जाईल. जेणेकरुन प्रत्येकाला सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती मिळू शकेल. 

निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन 

निवडणूक प्रचारादरम्यान आरोपांचा आणि भाषेचा स्तर घसरल्यास निवडणूक आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. तसेच स्टार प्रचारकांना विशेष नियमावली देण्याचे आदेश पक्षांना देण्यात आले आहेत. भाषेचा स्तर घसरल्याची त्याची दखल घेण्यात येईल. आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर दखल घेण्यात आली असून स्टार प्रचारकांनाही देखील नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करतेवेळी योग्य ती काळजी घ्यावी, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई करु, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.