yuva MAharashtra राज्यावर घोंघावतय जलसंकट; धरणांत उरले 40 टक्केच पाणी

राज्यावर घोंघावतय जलसंकट; धरणांत उरले 40 टक्केच पाणी



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - ऐन मार्च महिन्यात उन्हाळा राज्यात जोरात तापू लागला असतानाच आता राज्यावर मोठ्या प्रमाणावर 'जलसंकट' घोंघावू लागले आहे. एकूण धरणांपैकी सुमारे 20 जलसाठे पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत, तर 18 हून अधिक धरणांमध्ये केवळ 10 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूण सर्वच धरणांत सध्या केवळ 40.72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी किमान 55.45 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी मागील वर्षीपेक्षा सुमारे 14.12 टक्क्यांनी पाणीसाठा कमी राहिला आहे.
पाण्याची स्थिती एकूणच अत्यंत गंभीर बनली आहे.


मागील वर्षी ऐन पावसाळ्यात मोजकेच दिवस पाऊस पडला. त्यातही मराठवाड्यात पावसाने अत्यंत कमी प्रमाणात हजेरी लावली. कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे या भागातील काही धरणांचा अपवाद वगळता धरणे पूर्णपणे कोरडी पडली आहेत. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाण्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातही उजनी धरणाचा पाणीसाठा जास्तच खालावल्याने सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. कोकण भागात असलेल्या धरणांमधील पाणीसाठादेखील खालावलेला आहे. राज्यात जलसाठ्याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर भागाला बसला आहे. या भागात 21.13 टक्के एवढा जलसाठा आहे.

राज्यात जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मिळून एकूण 2 हजार 994 एवढी धरणे आहेत. मात्र, या सर्वच धरणांमधील जलसाठा गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने कमी होत चालला आहे.