सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारताने सोमवारी अग्नी-५ या आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची पाच हजार किलोमीटर अंतराची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे आता संपूर्ण पाकिस्तान आणि चीन भारतीय क्षेपणास्त्रांच्या तडाख्यात आले आहेत. या विशेष कामगिरीची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले.
या प्रकल्पाचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञ शीना राणी करत होत्या. त्या वर्ष १९९९ पासून अग्नी क्षेपणास्त्र प्रणालीवर काम करत आहेत. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मिशनला मिशन दिव्यास्त्र असे नाव दिले, त्याचप्रमाणे आता वैज्ञानिक शीना राणी यांची दिव्यापुत्री म्हणून चर्चा होत आहे.
पॉवरहाऊस ऑफ एनर्जी या नावाने प्रसिद्ध
५७ वर्षीय शीना राणी या हैदराबादमधील संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ ) उच्च तंत्रज्ञान प्रयोगशाळेत काम करणाऱ्या उत्कृष्ट वैज्ञानिक आहेत. त्यांच्या समर्पण आणि कामाप्रती प्रचंड उत्साह यामुळे त्यांचे सहकारी त्यांना ऊर्जेचे पॉवरहाऊस म्हणतात. अग्नी पुत्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या शीना राणी प्रसिद्ध मिसाईल वुमन टेसी थॉमस यांचेच प्रतिरुप आहेत.
टेसी थॉमस यांनी अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते आणि शीना राणी हाच वारसा पुढे नेत आहेत. डीआरडीओमध्ये २५ वर्षे कार्यरत राहिलेल्या शीना राणी यांच्या कार्यकाळातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. त्या अभिमानाने सांगते की मी भारताच्या रक्षणासाठी मदत करणाऱ्या डीआरडीओच्या कुटुंबातील एक सदस्य आहे.
शीना राणी यांनी तिरुअनंतपुरमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. शीना राणी यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनसोबतच कॉम्प्युटर सायन्समध्येही प्राविण्य आहे. भारतातील प्रमुख अंतराळ रॉकेट केंद्र विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे त्यांनी आठ वर्षे काम केले. वर्ष १९९८ मध्ये झालेल्या भारताच्या पोखरण अणुचाचणीनंतर त्या डीआरडीओमध्ये सामील झाल्या. १९९९ पासून शीना राणी अग्नी मालिकेच्या सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालीवर काम करत आहेत.
एके काळचे डीआरडीओचे प्रमुख आणि भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून आपण प्रेरणा घेतल्याचे शीना राणी सांगतात. डॉ. कलाम यांनीही विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी ते डीआरडीओमध्ये सामील झाले. शीना राणी यांचे पती पीएसआरएस शास्त्री यांनीही डीआरडीओसोबत क्षेपणास्त्रांवर काम केले आहे. 2019 मध्ये इस्रोने प्रक्षेपित केलेल्या कौटिल्य उपग्रहाचेही ते प्रभारी होते.