Sangli Samachar

The Janshakti News

संघशताब्दी वर्षानिमित्त प्रतिनिधी सभेत समाजहिताच्या पंच परिवर्तनावर चर्चा; कार्यविस्तारासाठी 1 लाख शाखांचे लक्ष्य !!



सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील 99 वर्षांपासून सामाजिक संघटना म्हणून कार्यरत आहे. संघाला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने करण्यात आलेल्या कार्य योजनेवर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीमध्ये विचार मंथन होईल. यावर्षी 15, 16, 17 मार्च 2024 असे तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघकार्याची आणि विशेषतः संघ शाखांची समीक्षा होईल. शताब्दी वर्षानिमित्त संघाने कार्य विस्तारासाठी 1 लाख शाखांचे लक्ष्य निश्चित केले असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंचावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया उपस्थित होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे वर्ष 2018 नंतर प्रतिनिधी सभेची बैठक जवळपास 6 वर्षानंतर नागपूरला होत आहे. या बैठकीला देशभरातून 1529 प्रतिनिधी अपेक्षित आहेत. संघ प्रेरित 32 संघटना आणि काही समूहांचा त्यात सहभाग राहील. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्काजी, विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमारजी आदी मान्यवरांची उपस्थिती राहील. बैठकीमध्ये उपस्थित सर्व संघटना देशामध्ये चालणारे विविध कार्य, समस्या, त्यांचे समाधान याबद्दल प्रतिनिधी सभेच्या बैठकीला माहिती देतील आणि यावर चर्चा सुद्धा होईल, असेही आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ऐतिहासिक असून, भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये या संदर्भात सुद्धा प्रस्ताव मांडण्यात येईल. या बैठकीमध्ये सरकार्यवाह यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या देशभरातील प्रवासाची योजना सुद्धा निश्चित होईल. त्याचबरोबर समाज हितासाठी पंच परिवर्तनावर बैठकीत व्यापक चिंतन होईल. पंच परिवर्तनामध्ये सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित व्यवस्था आणि नागरिक कर्तव्य यांचा समावेश आहे.

हे वर्ष अहिल्याबाई होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने संघाकडून या बैठकीमध्ये वक्तव्य सुद्धा दिले जाईल. मे 2024 ते एप्रिल 2025 या अवधीमध्ये ही जन्म त्रिशताब्दी साजरी केली जाणार आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये नवीन अभ्यासक्रम असलेल्या संघ शिक्षा वर्गांची सुद्धा चर्चा होईल. यावेळी अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमारजी आणि आलोककुमारजी उपस्थित होते.