सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
सांगली - लोकसभा निवडणुकीची धामधूम लवकरच सुरू होणार असताना जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 24 लाख नऊ हजार 77 मतदारसंख्या झाली आहे. यापैकी सांगली लोकसभेसाठी 18 लाख मतदारांचा समावेश आहे. या मतदारांकडून सांगलीचा खासदार ठरविला जाणार आहे, तर इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील मतदार हातकणंगले लोकसभेशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यात मृतांसह दुबार मतदारांमधील 71 हजार 486 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची मतदारसंख्या निश्चित झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंख्या जाहीर केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 24 लाख नऊ हजार 77 हजार मतदारसंख्या निश्चित केली आहे. यामध्ये 12 लाख 30 हजार 326 महिला आणि 11 लाख 78 हजार 637 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथीय 114 मतदार असून दुबार, मृत असे 71 हजार 486 मतदारांची नावे वगळली आहेत. जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील नवीन मतदारांची नोंदणी कमी होती. मतदार वाढवण्यासाठी निवडणूक विभागाने मोहीम राबवली. या मोहिमेला नवमतदारांनी चांगलीच साथ दिल्याने 24 हजार 62 मतदारांची नावनोंदणी झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 18 लाख तीन हजार 54 मतदार होते. माागील पाच वर्षांत जिल्ह्यात सहा लाख 6 हजार 23 मतदारांची संख्या वाढली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. सांगली लोकसभेसाठी 18 लाख 44 हजार 456 मतदारसंख्या आहे. या मतदारांकडून सांगलीचा खासदार ठरवला जाईल.