सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
सांगली - सांगली महापालिकेचे आर्थिक वर्ष सात दिवसांत संपणार आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी व घनकचरा कराच्या वसुलीसाठी महापालिकेत लगबग सुरू झाली आहे. सध्या मनपाची 49 कोटींची घरपट्टी वसुली झाली आहे, तर पाणीपट्टी 17 कोटी व घनकचरा कराची वसुली केवळ नऊ कोटी झाली आहे. टक्केवारीच्या प्रमाणात घरपट्टीची 45, पाणीपुरवठा विभागाची 20, तर घनकचरा 19 टक्के वसुली झाली आहे. दहा दिवसांत मनपाला 143 कोटींचा थकीत कर वसूल करणे मोठे आव्हान
असणार आहे.
सांगली महापालिकेचा आर्थिक गाडा हा प्रमुख घरपट्टी विभागावर चालतो, तर पाणीपुरवठा विभागाचा खर्च व उत्पन्न या तुलनेत पाणीपुरवठा विभाग तोटय़ात आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीची जास्तीत जास्त वसुली होणे महापालिकेच्या आर्थिक दृष्टीने चांगले असते; अन्यथा कर्मचाऱयांचे पगार व विकासकामांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी हे दोन्ही विभाग मजबूत केले होते. या विभागांत आवश्यक त्या कर्मचाऱयांची नेमणूकदेखील केली होती. डिसेंबर 2023 ते मार्च 2024पर्यंत अधिकारी व कर्मचाऱयांना वसुलीचे टार्गेट दिले होते. चालू मागणीबरोबर थकबाकी वसुलीवर भर दिला होता. त्यानुसार वसुली सुरू होती. मार्च महिन्याचे 15 दिवस पूर्ण झाले आहेत; पण वसुलीचे प्रमाण खूप कमी दिसत आहे.
घरपट्टीकराचे 58 कोटींपैकी फक्त 15 कोटी वसूल
घरपट्टी विभागाची थकबाकी 58 कोटी 25 लाख 61 हजार रुपये आहे. त्यापैकी केवळ 15 कोटी 84 लाख 38 हजार रुपये वसूल झाले आहेत, तर चालू मागणी 50 कोटी 22 लाख 76 हजार रुपये होती. त्यापैकी 33 कोटी 42 लाख 28 हजार रुपये वसूल झाले आहेत. तर, घरपट्टीची एकूण 108 कोटी 48 लाख 38 हजारांपैकी 49 कोटी 26 लाख 51 हजारांची वसुली झाली आहे. 10 दिवसात घरपट्टीचे उर्वरित 59 कोटी 31 लाख 86 हजार रुपये वसूल करावे लागणार आहेत. पाणीपुरवठा विभागाला मागील थकबाकीचे 41 कोटी, चालू 21 कोटी असे वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ 17 कोटी वसूल झाले आहेत. तर, घनकचरा कराची मागील 36 कोटींची थकबाकी 11 कोटींची चालू मागणी असे 48 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. त्यापैकी नऊ कोटी 21 लाख रुपये वसूल झाले आहेत. अद्यापि 38 कोटी 82 लाखांची वसुली बाकी आहे.