yuva MAharashtra मतदानासाठी 12 प्रकारचे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

मतदानासाठी 12 प्रकारचे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार



सांगली समाचार  - दि. २६ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये घोषित केले आहे.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील कारकुनी त्रुटी, शब्दलेखनातील चुका इत्यादी किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात, असे आयोगाने म्हटले आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख व वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी फोटो वोटर स्लीपऐवजी मतदार माहिती चिठ्ठी वितरणाच्या सूचना आयोगाने केल्या आहेत. सदर चिठ्ठी मतदानाच्या पाच दिवस अगोदर वाटप केली जाईल. परंतु, मतदारांना ओळखीचा पुरावा म्हणून सदर चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


असे आहेत १२ प्रकारचे पुरावे -

– आधार कार्ड
– मनरेगा जॉब कार्ड
– बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक
– कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
– वाहनचालक परवाना
– पॅनकार्ड
– रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड
– भारतीय पासपोर्ट
– फोटोसह पेन्शन दस्तऐवज
– केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र
– खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र
– केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र.