सांगली समाचार- दि. २० मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवण्याचा दावा भाजप सातत्याने करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपसाठी 370 आणि एनडीए आघाडीसाठी 400 जागांचे लक्ष्य ठेवलंय. हे ध्येय गाठण्यासाठी भाजप समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. या मालिकेत भाजप अल्पसंख्याक समाजालाही आपल्या निवडणूक प्रचारात जोडत आहे. मुस्लिमबहुल लोकसभेच्या 100 जागांसाठी भाजपनेही विशेष तयारी केलीय.
एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, भाजपने 100 मुस्लिम बहुल जागांवर ”मोदी मित्रा” तैनात करण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीची माहिती अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवणे हे त्यांचे काम आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना, सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि लोककल्याणकारी योजनांचा अल्पसंख्याक समाजातील लोकांना काय फायदा झाला, याचीही माहिती ‘मोदी मित्रा’ देत आहे.
मुस्लिमबहुल लोकसभेच्या जागा कुठे आहेत?
भाजपने देशभरात अशा 65 लोकसभेच्या जागा निवडल्या आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या 35 टक्के आहे. 65 जागांपैकी सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहेत. यूपीमध्ये 14 मुस्लिमबहुल जागा आहेत, तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे ही संख्या 13 आहे. केरळमध्ये 8, आसाममध्ये 7, जम्मू-काश्मीरमध्ये 5, बिहारमध्ये 4, मध्य प्रदेशमध्ये 3 आणि दिल्ली, गोवा, हरियाणा, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 2 जागा आहेत. तामिळनाडूमधील एका जागेचा समावेश आहे.
देशात लोकसभेच्या अनेक जागा आहेत जिथे मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावू शकत नाहीत, परंतु त्यांचे मत विजय-पराजय ठरवतात. अशा जागांची संख्या 35 ते 40 च्या आसपास आहे. अशाप्रकारे या 100 मुस्लिमबहुल जागा जिंकण्यासाठी भाजपने खास योजना आखली आहे.
मुस्लिम भाजपला मतदान करणार का?
त्याचवेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी, नुकत्याच झालेल्या रामपूर आणि आझमगड (लोकसभा पोटनिवडणुका) मध्ये त्याचा ट्रेलर दाखवण्यात आला होता. देशातील मुस्लिमांना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्त केले आहे. आता मुस्लिम समाज विशेषत: मुस्लिम भगिनींनी ‘ना दूरी है ना खाई है, मोदी हमारा भाई है’ असा नारा देत भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.