सांगली समाचार दि ०९|०२|२०२४
झोपलेल्या ध्रुवीय अस्वलाच्या मार्मिक छायाचित्राला प्रतिष्ठित 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या अस्वलाचे छायाचित्र हौशी ब्रिटिश छायाचित्रकार निमा सरिखानी यांनी क्लिक केले आहे.
विजेत्या निमा सरिखानी यांनी नॉर्वेजियन बेटांवर तीन दिवस ध्रुवीय अस्वलांचा शोध घेतल्यानंतर हे छायाचित्र क्लिक करण्यात यश मिळवले होते.
नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे दरवर्षी ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली जाते. संस्थेने नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलेल्या चित्रांबद्दलचा ब्लॉगही शेअर केला आहे.
'आइस बेड' नावाचे सरिखानी यांचे हे छायाचित्र विक्रमी 75,000 लोकांनी मतदान केलेल्या स्पर्धेनंतर विजयी घोषित करण्यात आले.
या कामगिरीबद्दल बोलत असताना निमा सरिखानी यांनी संग्रहालयाला सांगितले की, "मला या वर्षीचा पीपल्स चॉईस अवॉर्ड वाइल्डलाइफ फोटोग्राफी ऑफ द इयर, जिंकल्याबद्दल खूप अभिमान वाटत आहे. ज्यांनी ज्यांनी हे छायाचित्र पाहिले त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात या छायाचित्राने तीव्र भावना निर्माण केल्या आहेत."
"निमाचे चित्तथरारक आणि मार्मिक छायाचित्र आपल्याला आपल्या ग्रहाचे सौंदर्य आणि नाजूकपणा दाखवते, असे नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे संचालक डॉ. डग्लस गुर, म्हणाले.
जगभरातील छायाचित्रकारांनी स्पर्धेसाठी सादर केलेली छायाचित्रे स्पर्धेला समर्पित अधिकृत X हँडलवर नियमितपणे शेअर केली जात होती.