सांगली समाचार - दि. २५|०२|२०२४
अंतरवाली सराटी - मला सलाईन मधून औषध घालून मारण्याचा प्लॅन आहे, मी सागर बंगल्यावर येतो तिथेच मला मारा. असे आव्हान देत, मराठा आरक्षणावर आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील स्टेजवर उठून उभे राहिले आणि एकच खळबळ माजली.
महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मान्य झाला. परंतु " जे आम्ही मागितले नाही, ते आमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न चालला आहे." असे सांगून जरांगे पाटील यांनी कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको करण्याचे आवाहन केले. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कुठे शांततेत, कुठे पोलिसांना आवाहन देत, कुठे दगडफेक जाळपोळ करीत आंदोलन सुरू झाले आहे.
यातच आता जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच करण्याचा निर्धार केल्याने एकच खळबळ माजली आहे. आता जरांगे यांना त्यांचे कार्यकर्ते कसे आवरतात, आणि जरांगे यांच्या हटवादीपणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत शासन, प्रशासन व पोलीस खाते कसे तोंड देते हे पहावे लागेल.