सांगली समाचार - दि. २३|०२|२०२४
नवी दिल्ली - "एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर विधिमंडळात सभापती नार्वेकर यांनी अजित दादांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि पक्ष व चिन्ह अजित दादांना मिळाले. या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नार्वेकर व निवडणुक आयोगाचे कान पिळले आणि "नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार" हे नाव देण्यास सांगून चिन्हाबाबतही एक आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्ष तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केले आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मिळालेले हे महत्त्वपूर्ण चिन्ह विजयाची तुतारी घुमणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.