सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
मुंबई - मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. आम्ही शिंदे कमिटी केली. मग, मागणी आली सरसकट द्या. राज्यात व्याप्ती वाढवली. सगे सोयरे मागणी आली. आता ओबीसीमधून द्या. वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक झाली, आग लागली. आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठीची भावना होती तेव्हा मी स्वतः त्याच्याबरोबर होतो. मात्र, आता त्याची भाषा राजकीय वाटतं आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येतोय अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे 10 टक्के आरक्षणाच्या निर्णय घेतला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तेव्हा निर्णय घेतला होता. पण, नंतर सरकार बदलले. सर्वोच्च न्यायालयात त्यांना आरक्षण टिकवला आले नाही. आरक्षण टिकवण्यासाठी जे अपयश आलं होतं त्या त्रुटी आता दूर केल्या आहेत. 4 लाख लोक काम करत होते. मराठा आरक्षण 10 टक्के देण्याचा निर्णय घेतला. ओबीसी समाज, इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका होती. काही लोक म्हणतात टिकणार नाही. आम्ही दिलं आहे. तुम्ही तर दिलं नाही कधी? का टिकणार नाही? याची कारणं द्या? दिलेलं आरक्षण हे टिकणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारने जो सर्व्हे केला तो सॅम्पल सर्व्हे नाही. विस्तृत सर्व्हे केला आहे. कोर्टाने मांडलेल्या बाबींचा अंतर्भाव त्यात केला आहे. विरोधी पक्षाने कसं टिकवता येईल याच्या सूचना देण्यापेक्षा टीका करत आहेत. ज्यानं कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचेदेखील न्यायमूर्ती शिंदेंच्या माध्यमातून काम सुरू केलं आहे. कायदेशीर बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. आरक्षण दिल्यानंतर तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. कसं टिकेल याबाबत बोलला पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षांना केले.
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, सरकारने मराठा, ओबीसी समाज बाबतीत मोठे निर्णय घेतले. आज धनगर समाजाबाबतीत सुद्धा निर्णय घेतला. कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी जरांगे पाटील यांना दिला.
आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावताय का हे पाहावं लागेल. आता दिल्यानंतर विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. त्यांना वाटलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हिचं त्यांची भावना होती. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला जागा दाखवेल. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता कामा नये. कोणाला वाटत असेल सरकारला काही माहिती नाही. तर, सरकार, गृह विभाग सगळं लक्ष ठेवून आहे असा मोठा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून मनोज जरांगे पाटील यांनाही मोठा इशारा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाषा सांभाळावी. आपण काहीही केलं तरी चालेल असे कोणीही समजू नये असा इशारा त्यांनी दिला.
आम्ही कोणाच्या तरी घश्यात काही तरी करतोय असं दाखवलं जातंय. उचलली जीभ लावली टाळ्याला असं विरोधी पक्षाचे वागणं सुरू आहे असा टोला लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करतंय अशी भावना निर्माण करायची हे चुकीचं आहे. ड्रग्स संदर्भात मोठा तपास सुरू आहे. त्या तपासाचे कौतुक करायचं सोडून टीकाच सुरू आहे. पोलीस यंत्रणा खोलात जाऊन तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला. जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय हे पाहणं गरजेचं आहे असे अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाचा आतापर्यंत घेतलेला निर्णय टिकला नाही. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतले. पण, ते कोर्टात टिकले नाही. पण, आता आम्ही बारकाईने लक्ष घातलं आहे. बिहार राज्याप्रमाणे 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे 72 टक्के आरक्षण झालं आहे. तरीही काही वक्तव्ये केली जातात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाषा सांभाळावी. कोणीही असं समजू नये की आपण काहीही केलं तरी चालेल. सगेसोयरे बाबत साडे सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यावर सुद्धा काम सुरू आहे. राज्यात सर्वसामान्यांचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना पाठीमागे कोण आहे हे याच्या खोलात जावं लागेल. असे धाडस कसे होते? याच्या मागे कोण आहे यासाठी सरकार योग्य ती भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना विरोधी पक्षाने जे पत्र दिले तो अंतिम आठवड्याचा मसुदा दिला आहे. कोणता मुद्दा घ्यावा ते लक्षात येत नाही. गोंधळले आहेत असा टोला लगावला. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात 10 टक्के आरक्षण देऊन निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची तेवढीच चिंता असेल तर त्यांना सुध्दा पत्र लिहा जे सकाळी येऊन काही काही शब्द वापरतात असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही रोज विकासाची नवनवीन काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.