Sangli Samachar

The Janshakti News

"जरागेंच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी होणार- शंभूराजे देसाई"

सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

मुंबई  - संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा जर अशी वक्तव्ये करुन अवमान केला जात असेल, तर मनोज जरांगेंची सगळी वक्तव्यं तपासली जातील. त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस त्यांचं काम करेल, असा इशारा मंत्री शंभुराज देसाईंनी दिला आहे. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल ते बोलत होते.

शंभुराज देसाई म्हणाले की, "मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांतील ज्यांच्या पुर्वजांकडे कुणबी नोंदी आहेत त्या त्यांच्या वारसांना मिळाव्या. त्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली. सरकारने त्याबाबत निर्णय घेतला. त्यानंतर ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या. यावर परत मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि सरकारने ड्राईव्ह घेतला व सर्व यंत्रणांना कामाला लावलं."

"त्यानंतर जेव्हा स्वतंत्र मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा शिंदे समिती नेमली. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं. एवढं सगळं केल्यानंतरही जरांगेंची भुमिका रोज रोज बदलायला लागली. त्यांनी कधी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केले तर कधी फडणवीसांवर आरोप केला. सर्वात कहर म्हणजे जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांविषयी अरे तुरे ची भाषा केली. त्यांनी असंसदीय शब्द वापरले. याबाबत मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक मराठा समाजातील लोकांची मनं दुखावली गेली आहेत," असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, "मनोज जरांगेंच्या बोलण्यातून आता राजकीय वास यायला लागला आहे. त्यांना कुणीतरी सांगत आहे आणि ते बोलत आहेत, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. जरांगेंनी संयम बाळगायला हवा. त्यांनी थोडी विश्रांती घ्यायला हवी," असा सल्लाही त्यांनी जरांगेंना दिला. "आमच्या नेत्याला नाहक टार्गेट करुन जर त्यांच्यावर एकेरी उल्लेख करुन कुणी टीका करत असतील तर महायुतीतील कोणतेही नेते ते सहन करणार नाही. संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा जर अशी वक्तव्ये करुन अवमान केला जात असेल, तर कायदा कायद्याचं काम करेल. जरांगेंची सगळी वक्तव्यं तपासली जातील. त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस त्यांचं काम करेल," असेही शंभुराज देसाई म्हटले आहे.