सांगली समाचार | दि. ०५|०२|२०२४
गेल्या काही वर्षात मोबाईल "स्मार्ट बनल्याने त्याचा वापर केवळ फोन घेणे वा करणे इतकाच मर्यादित राहिला नाही. तर त्याचे अनेकानेक फायदे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत. आणि लाखालाखांचे मोबाईल सर्वांनाच खरेदी करणे जमत नसले, तरी गेला बाजार १०-२० हजारांचा मोबाईल खरेदी करणे सहजशक्य असते. परंतु मोबाईल लाखो रुपयांचा असो वा १०-२० हजारांचा. तो चोरीला गेला की "तोंडचे पाणी पळणे" या म्हणीचा आठवण येते. पण आता मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर घाबरण्याचे कारण नाही. तो मिळविण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.
मोबाईल हरविण्याबरोबरच इंटरनेटचा वापर वाढल्याने ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. इंटरनेट विश्वातील घोटाळ्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारही वेगाने प्रयत्न करत आहे. सरकारने सुरक्षा आणि गोपनीयता लक्षात घेऊन अनेक ॲप्स देखील जारी केले आहेत.
स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने गेल्या वर्षी सरकारी पोर्टल सुरू केले होते. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता. तुमचा फोन हरवला असला तरी तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता. या सरकारी पोर्टलबद्दचे नाव संचार साथी असे आहे. संचार साथी साईटवर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत ज्यामुळे घोटाळे आणि फसवणूक टाळण्यास मदत होते.
फोन हरवला तर तुम्ही ब्लॉक करू शकता
जर तुमचा फोन हरवला असेल किंवा कोणी चोरला असेल, तर संचार साथी पोर्टल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून काही सेकंदात तुमचा फोन ब्लॉक करू शकता. यामुळे तुमच्या फोनचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही आणि तुमचा डेटाही सुरक्षित राहील.
मोबाईल ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला sancharsaathi.gov.in वर जावे लागेल.
आता तुम्हाला येथे Block Stolen/Mobile Number या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला एक फॉर्म मिळेल ज्यामध्ये आवश्यक तपशील भरावा लागेल.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
OTP सत्यापित केल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
जुन्या फोनचीही मिळणार माहिती
जर तुम्ही जुना किंवा सेकंड हँड मोबाईल खरेदी करणार असाल तर संचार साथी ॲप तुम्हाला इथेही मदत करेल. या पोर्टलवर Know Your Mobile ची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने तुम्ही जुना फोन खरेदी करण्यापूर्वी त्याची पडताळणी करू शकाल. म्हणजेच फोन चोरीचा आहे की नाही हे तुम्हाला कळू शकेल.
सक्रिय मोबाईल क्रमांकाची माहिती उपलब्ध
अनेक वेळा आपण आपल्या नावावर आतापर्यंत किती सिम खरेदी केली आहेत हे आपल्याला माहिती नसते. आपण संचार साथी पोर्टलवर देखील ही माहिती मिळवू शकता. या पोर्टलवर TAFCOP विभाग दिलेला आहे. तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहेत हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. एवढेच नाही तर, जर तुम्हाला असे आढळून आले की असा नंबर आहे जो तुम्हाला मिळालेला नाही, तर तुम्ही तो लगेच ब्लॉक करू शकता किंवा तक्रार करू शकता.