Sangli Samachar

The Janshakti News

दहावी-बारावीचा अभ्यास वाढणार

सांगली समाचार  - दि. २१|०२|२०२४

नवी दिल्ली - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  महत्वाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार असून आता जास्त विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत. त्यानुसार दहावीला 10 विषयांचा तर बारावीला 6 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. याविषयी सीबीएसईने (CBSE) शाळांना सूचना देण्यास सांगितले आहे. शाळांकडून सूचना आल्यानंतर हे बदल होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (New Education Policy) अनुसरून हे बदल होणार आहेत; अशी माहिती आहे.

भारतीय भाषांची सक्ती 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार 10 वी, 12 वीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

10 वीमध्ये 2 ऐवजी 3 भाषांची सक्ती असणार आहे. यामधील दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच 11 वी-12वीत एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भारतीय भाषा (Indian language) असणार आहे. तसेच नववी-दहावीत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या वाढवली आहे. विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषय शिकावे लागणार आहेत. यामध्ये 3 भाषा तर 7 मुख्य विषय असणार आहेत. या विषयांमध्ये गणित, संगणक शास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे.

दहावी प्रमाणे अकरावी-बारावीच्या (New Education Policy) स्तरावर बदल केला आहे. आता बारावीत दोन भाषा आणि चार मुख्य विषय असणार आहेत. बारावीत सर्व विषयांची चार गटात विभागणी होणार आहे. त्यात भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय असे चार गट असणार आहेत.