सांगली समाचार - दि. १५|०२|२०२४
नवी दिल्ली - कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या हिंदुस्थानच्या सात माजी नौसैनिकांची दीड वर्षातच सुटका झाली. मात्र हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव हे हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी गेली सात वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत.
नौसैनिकांच्या सुटकेच्या घटनेमुळे आता 'कुलभूषण यांची सुटका कधी होणार? भाजप सरकार सातारच्या सुपुत्राला हिंदुस्थानात कधी आणणार?' असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. सातारा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आनेवाडी गावच्या हद्दीत आनेवाडी टोलनाक्याजवळ कुलभूषण जाधव (वय 53) यांची शेती व शेतघर आहे. ते व त्यांचे कुटुंबीय या घरी अधूनमधून राहायला येत असत. त्यावेळी कुलभूषण यांची आनेवाडी गावातही उठबस असे. समाजकार्यातही ते मदत करत असत. त्यामुळे त्यांच्याविषयी आनेवाडी व परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. ते आपल्याच गावचे आहेत असे गावकरी मानतात. पाकिस्तानच्या कालकोठडीतून त्यांची सुटका व्हावी, अशी प्रत्येक आनेवाडीकरांची भावना आहे.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने 2016 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली कैदेत टाकले. तेथील न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या विरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात तत्काळ बाजू मांडल्यानंतर या शिक्षेला मे 2017 मध्ये स्थगिती मिळाली आहे. कुलभूषण यांच्या सुटकेकडे अवघा देश डोळे लावून बसला आहे. परंतु, या घटनेला सात वर्षे उलटून गेली तरी त्यांची पाकच्या तुरुंगातून सुटका झालेली नाही. त्याच ठिकाणी ते खितपत पडले आहेत. त्या ठिकाणी त्यांची अवस्था कशी आहे? काय यातना त्यांच्या वाटय़ाला येत असतील? असे प्रश्न त्यांचे नातेवाईक व त्यांच्याविषयी आस्था असणाऱया प्रत्येकाचे काळीज कुरतडत आहेत.
या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2022 मध्ये कतारमध्ये हेरगिरीच्याच आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्या गेलेल्या आठपैकी सात हिंदुस्थानी नौसैनिकांची दीड वर्षात सुटका झाल्यामुळे कुलभूषण यांचा विषय पुन्हा अजेंडय़ावर आला आहे. किंबहुना कुलभूषण यांच्या सुटकेच्या बाबतीत देशवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. ते सात नौसैनिक मायदेशी परतल्याचे सोमवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्याचवेळी हे केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश असल्याचे सांगितले जात आहे. अशी मुत्सद्देगिरी पाकच्या कैदेत सात वर्षांहून अधिक काळ खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव यांच्या बाबतीतही केंद्र सरकारने दाखवावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.