Sangli Samachar

The Janshakti News

"इलेक्टोरल" चा झटका देणा-या रणरागिणी... पण कोण ?...

 



सांगली समाचार  - दि. १५|०२|२०२४

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही योजना रद्द करून घटनाबाह्य ठरवले आहे. इलेक्टोरल बाँड विरोधात लढणाऱ्यांपैकी आणि न्यायालयात याचिका करणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे जया ठाकूर.

कोण आहेत जया ठाकूर ?

जया ठाकूर या काँग्रेसशी संबंधित असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. जया यांचे पती वरुण ठाकूर हे सुप्रीम कोर्टात वकील आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जया या मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदा येथील रहिवासी आहेत. जया यांनी सर्वसामान्यांशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात नेली आहेत. नुकतेच समोर आलेले इलेक्टोरल बाँड्स हे देखीलत्यापैकी एक प्रकरण आहे ज्यावर त्यांनी केंद्राविरुद्ध न्यायालयात लढा दिला आहे.





न्यायालयाच्या निर्णयावर जया ठाकूर काय म्हणाल्या ?

जया ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, ते पारदर्शक असावे. माहिती अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. किती पैसे कोणी आणि कोणाला दिले याचा खुलासा व्हायला हवा.

त्या पुढे म्हणाले की, २०१८ मध्ये जेव्हा ही निवडणूक बॉण्ड योजना प्रस्तावित करण्यात आली होती, तेव्हा असे सांगण्यात आले होते की, तुम्ही बँकेकडून बाँड खरेदी करू शकता आणि पक्षाला पैसे देऊ शकता. पक्षाला देणगी देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले जाणार नाही. जे माहितीच्या अधिकाराच्या विरोधात आहे. याचा खुलासा झाला पाहिजे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ते पारदर्शक असावे आणि त्यांनी देणगीदारांची नावे उघड करावीत, असे मी याचिकेत म्हटले आहे अशी माहिती जया यांनी दिली.