सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
सांगली - एकेकाळी सांगली म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सत्ता केंद्र होते. सांगलीत घेतलेला निर्णय राज्यच नव्हे तर केंद्र शासनही अंमलात आणू पाहत होते. काळ बदलला, पक्ष नेतृत्व बदलले, तसे विजयाचे समीकरणही बदलले. काँग्रेस पक्ष सध्या अतिशय अटीतटीच्या परिस्थितीला सामोरे जात आहे. राज्यातील आणि देशातील अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघाचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा सहाजिकच दादा घराण्यातील विशाल पाटील आणि जयश्रीताई यांचेच नाव अग्रभागी दिसते. जयश्रीताईंनी लोकसभेच्या विजयाचे गणित आजमावून पाहिले. याचा विचार करता, सांगली विधानसभा क्षेत्रच चांगले. म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीतून काढता पाय घेतला. काँग्रेस पक्षातील संभाव्य बलाढ्य नावांचा विचार केला तर, कदम आणि दादा घराण्यांचेच वर्चस्व दिसून येते. दादा घराण्यातील प्रतीक पाटील यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केलेली आहे. तर जयश्रीताई पाटील यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे.
सहाजिकच विषय येऊन थांबतो तो, कदम घराण्यातील डॉ. विश्वजीत कदम आणि दादा घराण्यातील विशाल पाटील यांच्याजवळ. डॉ. विश्वजीत कदम यांनाही विधानसभाच बरी वाटते. कदम घराण्यातील अन्य कुणीही लोकसभेच्या रिंगणात उतरू इच्छित नाहीत. त्यामुळे एकमेव नाव उरते ते विशाल पाटील यांचे.
परंतु विशाल पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुखकर नसल्याचे गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा असला तरी, शेजारच्या मित्र पक्षाच्या नेतृत्वाने खोडा घातला व विशाल पाटील यांना स्वाभिमानीची कास धरावी लागली. परंतु त्यांच्या विजयाची शिट्टी काही वाजली नाही. या पाठीमागे अनेक कंगोरे आहेत.
यंदाही या लोकसभा निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील आपले पुत्र प्रतीक पाटील यांच्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जरी त्यांची उमेदवारी जाहीर केली, तरी जयंत पाटील त्यांना मनापासून साथ देणार का ? हा कळीचा मुद्दा उपस्थित होतो. आणि म्हणूनच त्यांच्यासमोर भाजपचे संजय पाटील की पृथ्वीराज देशमुख या संभाव्य उमेदवाराच्या कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होते, यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत.
विद्यमान खासदार संजय पाटील हे विजयाची हॅट्रिक करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरलेले आहेत. मात्र भाजपा अंतर्गत असलेल्या त्यांच्या शत्रूंची संख्या मोठी आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. यात कोण बाजी मारतं ? यावर विशाल पाटलांसमोरची आव्हानं ठरणार आहेत.
विशाल पाटील यांच्यासमोर तिसऱं आव्हान महेश खराडे यांनी उभं केलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी गेल्या काही दिवसात विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद उभी केली आहे. त्यांच्यापाठी शेतकऱ्यांची किती मतं आहेत, हे सध्या तरी गुलदस्तात आहे. ऐनवेळी अन्य कुठल्या पक्ष मी उमेदवार विशाल पाटलांचे स्पीड ब्रेकर ठरतो, हेही पहावे लागेल. इतर पक्षांनी उमेदवार यांची मते त्यांच्या विजयासाठी फायद्याची ठरोत न ठरोत, ते विशाल पाटील व संजय पाटील किंवा पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी डोकेदुखीची नक्कीच ठरतील. या साऱ्या पार्श्वभूमीवर, विशाल पाटील यांचा विजय रथ दिल्ली दरबारी पोहोचतो की गतवेळप्रमाणेच सांगलीतील फोडाफोडीच्या दलदलीत रुततो, याचे उत्तर आगामी लोकसभेच्या निवडणूक निकालानंतरच दिसून येईल.