yuva MAharashtra राजकारणातील उतावळ्या नव-यांसाठी अनेकजण हार घेऊन उभे !

राजकारणातील उतावळ्या नव-यांसाठी अनेकजण हार घेऊन उभे !

 

सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४

मुंबई - आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"... यापूर्वी राजकारणातील असे अनेक उतावळे नवरे सत्तासुंदरीला मिळविण्यासाठी, अनेक पक्षांचे उंबरे झिजवताना आपण पाहिले असतील. परंतु सध्याचा ट्रेंड वेगळा आहे. सध्या हे उतावळे नवरे कुठल्या पक्षाच्या दारात जात नाहीत, तर पक्षच अशा उतावळ्या नवऱ्यांसाठी (अर्थात ज्याची त्याची पात्रता-कुवत पाहून) हार घेऊन उभे आहेत. आणि म्हणूनच राजकारणातील हे उतावळे नवरे, कधी कुठल्या दारात- घरात दिसतील नि कधी तेथून बाहेर पडतील हे सांगता येत नाही. 

सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ), शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) या महाराष्ट्रातील पक्षात असे उतावळे नवरे पहावयास मिळत आहेत. देशाच्या राजकीय पक्षांची तऱ्हा वेगळी नाही. आणि याला कुठलेच पक्ष अपवाद नाहीत.  एखाद्या पक्षात वजनदार वराची डाळ शिजली नाही तर, त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी दुसरे पक्ष अनेक प्रकारचे प्रलोभणे दाखवताना दिसत आहेत. परिणामी अशा वारांची सर्वत्र चलती असल्याचे जाणून येते. अर्थात सध्या हे जे उतावळे नवरे आहेत, त्यांची गर्दी भाजपाच्या घरात दिसून येत आहे. आता कुठल्या वराला कुठली सत्तासुंदरी वरमाला घालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.