yuva MAharashtra मराठा आंदोलन नव्या वळणावर; काय घडणार ? कसं घडणार ?

मराठा आंदोलन नव्या वळणावर; काय घडणार ? कसं घडणार ?

सांगली समाचार- दि. २१|०२|२०२४

जालना - मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशनात निर्णय घेऊन आरक्षण दिलं. तरी हे आरक्षण नको आहे सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी आंदोलनाचा यल्गार पुकारला आहे. २४ फेब्रुवारीपासून आंदोलन करा असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. सरकारने दोन दिवसा सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करा. २२-२३ ला निवेदन द्यावं लागेल, हे निवेदन कायमस्वरुपी असल्याचंही ते म्हणाले.

आंदोनल कसं करायचं याचेही स्वरुप मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आपण फक्त गाव सांभाळायचे, कुणी तालुक्यात, जिल्ह्यात जाणार नाही. पूर्ण गाव आंदोलनात आले तर ताकद मिळेल. आंदोलन जेरीस आणण्यासाठी करायचं आहे. सगेसोयरे अंमलबजावणीसाठी आंदोलन करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

आंदोलन सकाळी साडेदहा वाजता सुरू करायचं आहे. सर्व गावाने आंदोलन ठिकाणी यायचं. परवानगी जरी दिली नाही तरीही आंदोलन करायचं. एकानेच निवेदन द्यायचं. सर्वांनी जायचं नाही. कारण नोटीस एकालाच येईल. 24 तारखेला आंदोलन सुरू करायचे साडेदहा ते एक वाजे दरम्यान करायचे. ज्याला जमले नाही त्याने 4 ते 7 वाजता करायचे असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.

रास्तारोको सुरु असताना परीक्षेला जाणारा कुणी आला तर त्याला त्याच्या शाळेत सोडून यायचं. गाडी फोडायची नाही, जाळपोळ करायची नाही. शांततेत हे रास्ता रोको असेल आणि याची नोंद देशात होईल. 24 तारखेला आंदोलन सुरू होईल. साडेदहा वाजता सुरू करायचे ते एक वाजेपर्यंत असेल. रास्ता रोको कुठलाही महामार्ग असला तरी करायचा असंही जरांगे पाटील म्हणाले.