yuva MAharashtra फडणवीसांचं मोठं पाऊल; भाजप आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

फडणवीसांचं मोठं पाऊल; भाजप आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

मुंबई - मराठा आरक्षणाबाबत आंदोलक मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मराठा समाज निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला जागा दाखवून देईल, असा निर्वाणीचाही इशारा जरांगेंनी दिला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी फडणवीसांनी मराठा समाजाबाबत आमदारांना महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती आहे.  अर्थ संकल्पीय अधिवेशन व मराठा आरक्षण आंदोलन याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच फडणवीसांनी  आमदारांच्या मतदारसंघातील कामांचा आढावाही घेतल्याचे बोलले जात आहे. तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना आंदोलन संयमाने हाताळण्याच्या सूचना करत आपण मराठा समाजासोबत असल्याचा संदेश पोहाेचवण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाजाच्या आपण पाठीशी आहोत, हे तुम्ही मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचवा. आपल्याला आरक्षण मुद्दा संयमाने हाताळावा लागेल. भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे, यात काही दुमत नाही. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण आपल्या सरकारने दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकवले होते. आताही आपण दिलेले आरक्षण आपणच ते टिकवणार आहोत हे समाजापर्यंत पोहाेचवा, असे आवाहन फडणवीसांनी आमदारांना केल्याची माहिती आहे. दरम्यान, मराठा आंदोलक जरांगेंनी फडणवीसांवर जिवे मारण्याचे आरोप केले आहेत. त्यासाठी त्यांनी सलाइनमधून विष देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांकरवी गोळ्या घालून एन्काउंटर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप केले. यावर फडणवीसांनी मनोज जरांगे आता वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत असल्याची टीका केली.