yuva MAharashtra विशाल पाटील यांच्या पत्नीने पतीच्या विजयासाठी हाती घेतलं सौभाग्याचं लेणं !

विशाल पाटील यांच्या पत्नीने पतीच्या विजयासाठी हाती घेतलं सौभाग्याचं लेणं !

सांगली समाचार - दि. २३|०२|२०२४

सांगली - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील मैदानात उतरल्या असून, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील गावोगावी 'मी सक्षमा' कार्यक्रमातून निवडणुकीसाठी सौभाग्याचं लेणं हाती घेतलं आहे.

खासदारांच्या 'होम ग्राउंड'वर विशाल पाटलांच्या होम मिनिस्टर'नी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार सुमनताई पाटील यांचा सहभागही लक्षवेधी ठरत आहे. खासदारांच्या बालेकिल्ल्यातच विशाल पाटलांनी आव्हान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.

लोकसभेला तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ खा. पाटील यांचा बालेकिल्ला राहिला आहे. किंबहुना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीचे सेटलमेंटचे राजकारणही वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी खासदारांना उच्चांकी मताधिक्य मिळाले होते.

गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांत झाली. त्यामुळे पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाली आहे. खासदारांच्या बालेकिल्ल्यातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

गावोगावी महिला मेळावे घेण्याबरोबरच जिल्हा परिषद गटनिहाय स्वतः विशाल पाटीलदेखील मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी 'मी सक्षमा' कार्यक्रमांतर्गत महिलांचे मेळावे घेतले जात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग बोलका ठरत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारांच्या बालेकिल्ल्यातच खासदार विरोधकांकडून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न आतापासूनच दिसून येत आहे.

मागील निवडणुकीनंतर विशाल पाटील यांचा जनसंपर्क काहीसा कमी झाला होता. पाटील हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे करीत होते, परंतु सामान्य मतदारांची नाळ तुटली होती. स्वतः विशाल यांनीही गावागावांत जाऊन संपर्क साधून प्रश्नांवर चर्चा करीत आहेत. आता त्यांच्या जोडीला पत्नी पूजा याही सक्रिय झाल्या आहेत. महिला मेळाव्याच्या निमित्ताने महिला मतदारांत विशाल पाटलांच्या निवडणुकीतही साखर पेरणी करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

सेटलमेंटच्या राजकारणाला ब्रेक

मागील काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खासदार गट आणि आमदार गटात 'सेटलमेंट'चे राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले होते. बदलत्या राजकीय समीकरणात खासदार पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे विधानसभेला खासदार विरुद्ध आमदार गटात निकराचा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या वेळी सेटलमेंटच्या राजकारणाला फाटा देत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा अजेंडा अमलात आणण्यास सुरुवात केली आहे.