सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
लातूर - महाराष्ट्र काँग्रेसला सध्या घरघर लागली आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला होता. अशोक चव्हाणांसह आमदार अमित देशमुख सुद्धा भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना अमित देशमुखांनी पूर्णविराम देत स्वर्गीय, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक संदर्भ दिला आहे.
"एकेकाळी विलासराव देशमुखांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली. तोही काळ आपल्याला आठवतोय. काही काळ विलासराव देशमुखांना बेदखल करण्यात आलं होतं. पण, तेव्हा विलासराव देशमुखांनी माध्यमांना संवाद साधताना सांगितलं की, 'मला तुम्ही काँग्रेस पक्षातून काढून टाकाल. मात्र, माझ्या रक्तातली काँग्रेस तुम्ही कशी काढणार?' हे विलासराव देशमुखांचं वाक्य आहे. पण, मी जिथं आहे तिथं ठिक आहे," असं म्हणत भाजपत जाण्याच्या चर्चांवर अमित देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं.
"मी जिथं आहे, तिथं ठिक आहे. समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडं-तिकडं जाणं, हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही," असं अमित देशमुखांनी म्हटलं आहे. लातूरमधील निवळी येथे विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळण्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमित देशमुख बोलत होते.