सांगली समाचार दि. १२|०२|२०२४
गेल्या हंगामात 'एल निनो'चा मान्सूनला फटका बसला. तसेच २०२३ हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले. दरम्यान, आगामी मान्सून हंगामाबाबत आनंदाची बातमी आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'एल निनो' परिस्थिती जून २०२४ पर्यंत संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे मुबलक मान्सून पावसाची शक्यता अधिक आहेत. पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दोन जागतिक हवामान संस्थांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, 'एल निनो'ची तीव्रता कमकुवत होत आहे. ऑगस्टपर्यंत 'ला निना'ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जून-ऑगस्टपर्यंत 'ला नीना' परिस्थिती निर्माण झाली तर मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
भारतातील ७० टक्के कृषी मान्सूनवर अवलंबून
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी देखील जून-जुलैपर्यंत 'ला नीना' विकसित होण्याची उच्च शक्यता असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. एल निनोचे संक्रमण ENSO-न्युट्रल स्थितीत झाले तरी मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला राहण्याची अपेक्षा आहे. नैऋत्य मान्सून, भारताच्या वार्षिक पावसाच्या अंदाजे 70 टक्के, कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे, जे GDP मध्ये सुमारे १४ टक्के योगदान देते आणि भारताच्या १.४ अब्ज लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांना रोजगार देते.
यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) आणि युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (C3S) ने पुष्टी केली की एल निनो कमकुवत होत आहे. NOAA ने असेही म्हटले आहे की ला निनामध्ये मजबूत एल निनो घटनांचे अनुसरण करण्याची ऐतिहासिक प्रवृत्ती आहे. एल निनोचे ENSO-न्युट्रल स्थितीत रूपांतर झाले तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा मान्सून चांगला राहण्याची अपेक्षा आहे.
यंदा अनेक मॉडेल्स 'अल निनो'चा अंत सूचित करतात
'सध्या, आम्ही निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. काही मॉडेल्स ला निना दर्शवतात, तर काही ENSO-तटस्थ परिस्थितीचा अंदाज लावतात. तथापि, सर्व मॉडेल्स अल निनोचा अंत सूचित करतात, असे मत भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ शिवानंद पै. यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
'ला निना'चा अर्थ काय आहे ?
स्पॅनिश भाषेत 'ला निना' या शब्दाचा अर्थ लहान मूल असा होतो. नॅशनल ओशनिक सर्व्हिस ऑफ नॅशनल ओशनिक एण्ड एटमाॅस्पेरिक एडमिनिस्ट्रेशन (NIAA) यांच्या म्हणण्यानुसार 'ला निना'ला एल-विएजो किंवा एंटी-एल निनो, असं म्हंटलं जाऊ शकते. 'ला निना'ला चक्र म्हणूनही ओळखले जाते आणि प्रशांत महासागरावर नैसर्गिकपणे उद्भवणाऱ्या वातावरणाचा भाग आहे. ३ ते ७ वर्षांनंतर 'ला निना' परिस्थिती निर्माण होत राहते.
'ला निना'मुळे वातावरणात कोणते परिणाम होतात ?
चक्रीवादळावर 'ला नीना'मुळे परिणाम होतो. ला निना आपल्या गतीने उष्णकटिबंधीय प्रदेशातीत चक्रिवादळांची दिशादेखील बदलू शकतो. तसेच ला निनामुळे उत्तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणात उबदार आर्द्रतेती स्थिती निर्माण होते. त्याचबरोर इंडोनेशिया आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. इक्वाडोर आणि पेरू देशात दुष्काळीची स्थिती निर्माण होऊ शकते आणि ऑस्ट्रिलियात पूर येण्याची शक्यता वाढते. दरम्यान भारतात मोठ्या प्रमाणात थंडी आणि पाऊस पडण्याची शक्यता असते.