yuva MAharashtra चर्चा बारामतीच्या तुलनेत अकलूजच्या काका पुतण्यांची

चर्चा बारामतीच्या तुलनेत अकलूजच्या काका पुतण्यांची

सांगली समाचार- दि. २३|०२|२०२४

अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सत्तारूढ भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार धुमशान सुरू आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा कल हा निंबाळकर यांच्याकडे असल्याचे पाहून खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पुतण्याच्या लोकसभा उमेदवारीसाठी मैदानात उतरल्याचे मानले जात आहे. मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आर या पार या भूमिकेवर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपले काका शरद पवार यांच्या विरोधात पोपटलेले दंड कुठे आणि आपले पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरलेले विजय दादा कुठे असावा राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून ज्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या आधारावर निंबाळकर निवडून आले, त्या मोहिते पाटील यांच्याशीच खासदार निंबाळकर यांचे मतभेद निर्माण झाले. हे मतभेद एवढे वाढले आहेत की, निंबाळकर यांच्याऐवजी आपल्याला माढ्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी भूमिका मोहिते पाटील यांनी घेतली आहे. मोहिते पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, त्यांनी मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्याही पूर्ण केल्या आहेत.

दरम्यान, माढा लोकसभेसाठी माहिते पाटील आग्रही असले तरी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा कल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. त्यामुळे मोहिते पाटीलही इरेला पेटल्याचे दिसून येते. त्यातूनच आता पुतण्याच्या उमेदवारीसाठी खुद्द विजयदादा कामाला लागल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय साखर संघाच्या बैठकीसाठी गेलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. साखर संघाची बैठक असली तरी भाजप हायकमांडशी त्यांची माढा लोकसभा उमेदवारीच्या संदर्भाने नक्की चर्चा झाली असणार. आता भाजप हायकमांड काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.

अमित शाह यांच्यानंतर विजयदादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील हेही होते. या भेटीचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून आग्रही असलेले मोहिते पाटील यांनी ही बाब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर नक्की घातली असणार.

शंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात जयसिंह मोहिते पाटील यांनी कोणी लढो अथवा न लढो, मी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर खुद्द विजयदादांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माढ्याच्या रणसंग्रामात मोहिते पाटील यांनी उतरण्याचे पक्के केल्याचे दिसून येते.