2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी झाल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. याच पाच वर्षांत दोन पक्ष आणि एका परिवारात उभी फूट पडली. या पक्ष फुटीच्या वादळात मात्र काँग्रेसचा 'हात' महाराष्ट्रात शाबूत होता. असे असतानाच मात्र आता याच काँग्रेसला मुंबईत गळती लागल्याचे चित्र आहे. कारण, मागील काही दिवसापूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस सोडून कोठेही जात नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे.
काँग्रेसच्याच मोठ्या नेत्याने केला दावा
एका इंग्रजी वेबसाइटला काँग्रेसमधीलच एका मोठ्या नेत्यानी माहिती दिल्यानंतर ही बातमी पुढे आली. राज्यातील तब्बल 15 काँग्रेसचे आमदार महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच हे पक्षांतर घडवून आणण्याच्या बेतात भाजप असल्याचे काँग्रेसच्या नेत्याने सांगितल्याने खळबळ उडाली.
काँग्रेसकडून आमदारांची मनधरणी
देशभरात 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसच्या 15 नेत्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेसच्या वतीने त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे पक्ष सोडण्याची कारणे समजून घेतली जात आहेत अशीही माहिती समोर आली आहे.