yuva MAharashtra लग्न समारंभात मावळ्यांची वेशभूषा आढळल्यास कारवाई

लग्न समारंभात मावळ्यांची वेशभूषा आढळल्यास कारवाई


सांगली समाचार  - दि. १८|०२|२०२४

पुणे - अलीकडे बऱ्याच लग्न समारंभामध्ये वधूला डोलीत बसून आणण्यासाठी मावळ्यांचा वापर करण्यात येत होता. याबद्दल प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षरीत्या नाराजी ही व्यक्त होत होती. आता हा प्रकार किमान लोणी काळभोर परिसरापुरता तरी थांबणार आहे. कारण, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, लग्न समारंभामध्ये मावळ्यांची वेशभूषा परिधान करून दुय्यम कामे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कड यांनी मावळ्यांच्या वेशभूषेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची विटंबना होत असून लग्न समारंभात मावळ्यांची वेशभूषा बंद करावी. अशी मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावेळी भवरापुरचे सरपंच सचिन सातव व पत्रकार सचिन सुंबे उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते


.

त्याप्रमाणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तसे कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मंगल कार्यालयाचे चालक-मालक यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना त्यांच्या मंगल कार्यालय मध्ये विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाच्या वेळी यापुढे मावळयांची वेशभूषा परिधान केलेला लोकांचा मंगल कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी वापर करू नये.

तसेच वधू -वरांच्या नातेवाईकांना देखील कार्यालय बुकिंग करतेवेळी मंगल कार्यालय मालकांनी समज देण्यात यावी. याबाबत सर्व कार्यालयांना नोटीस दिल्या असून यापुढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही असा प्रकार घडल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

लग्न समारंभांमध्ये मावळ्यांच्या वेशभूषा परिधान करून अनेक दुय्यम कामे करून घेण्यात येतात. कुठलेच काम हे कमी लेखायचे नाही. पण त्यामध्ये परिधान केलेल्या वेशभूषेमुळे छत्रपतींच्या मावळ्यांची विटंबना होत आहे. त्यामुळे असे प्रकार त्वरित थांबवावे. या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व हवेलीचे तहसीलदार यांना निवेदन दिले होते.

लग्न समारंभातील या प्रकारामुळे काही लोकांना रोजगार मिळत होता ही गोष्ट खरी असली तरी त्यामुळे शिवरायांच्या मावळ्यांची बदनामी होत होती. आता लोणी काळभोर प्रमाणेच राज्यातील इतर भागात हे मावळ्यांची बदनामी करणारा हा प्रकार थांबवावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांतून होणार हे नक्की