सांगली समाचार | बुधवार दि. ०७|०२|२०२४
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे.
तर शरद पवार यांच्या गटाला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात होता, याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यातील पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असं निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय घेऊन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे नाव फायनल केलं आहे.
चिन्हाचा प्रस्ताव पाठवला गेला नाही
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. यामागेदेखील एक कारण आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर होत नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवण्यात आलेला नाही.
शरद पवार गटाचं दिल्लीत शक्तीप्रदर्शन
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता दिल्लीत शरद पवार गटात हालचाली वाढल्या आहेत. शरद पवार गटाकडून दिल्लीत आमचा पक्ष, आमचं चिन्ह अशा अशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार हे स्वत: आता संवाद साधणार आहेत. शरद पवार गटाच्या इतर नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पण शरद पवार यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे शरद पवार नेमकं काय म्हणतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.