सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आमदारकीसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपध्ये प्रवेश केला. चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा महाराष्ट्रात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण कधीकाळी राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही आमदारही भविष्यात पक्ष सोडू शकतात, असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय झाले असून आज पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
शरद पवार यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. "मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सदिच्छा भेट घेतली," अशी माहिती पवार यांनी दिली आहे. तसंच या बैठकीला काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते.
चव्हाणां यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधील अन्य कोणी नेते पक्षातून बाहेर पडू नयेत आणि आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली असून महाराष्ट्र काँग्रेसची विस्कटलेली घडी बसविण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक चव्हाणांनी का सोडली काँग्रेस?
अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे. 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी याबाबत भाष्य केलं आहे. "निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला होता. त्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी होत नव्हती. राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते. आताची वेळ ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची, लोकांचे प्रश्न तडीस लावण्याची असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण वगैरे चालले होते. या सगळ्या कार्यशैलीबद्दल मी बोललो, सूचना केल्या पण त्यांची दखल घेतली गेली नाही. शेवटी किती वाट पहायची? टीमवर्क दिसत नव्हते," असा दावा चव्हाण यांनी केला आहे.