सांगली समाचार दि. १०|०२|२०२४
नवी दिल्ली - भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहांतील आपल्या सर्व खासदारांना उद्या (शनिवार) उपस्थित राहण्याचा पक्षादेश (व्हिप) जारी केला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अजेंड्यावर नेमके काय आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या समाप्त होणार आहे. भाजपने अखेरच्या दिवशी सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. महत्वाचे कामकाज होणार असल्याचे खासदारांना सूचित करण्यात आले आहे. मात्र, त्या कामकाजाविषयी कुठली औपचारिक माहिती उघड करण्यात आलेली नाही.
संबंधित अजेंड्याविषयी भाजपच्या खासदारांनीही अनभिज्ञता व्यक्त केली आहे. याआधी मोदी सरकारने अखेरच्या क्षणी काही महत्वाचे विषय संसदेत मांडून सर्वांनाच चकित केले होते. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्याआधीचे सध्या सुरू असलेले अधिवेशन अखेरचे ठरणार आहे.
त्यामुळे अखेरच्या अधिवेशनातील अखेरच्या दिवशी सरकार कुठले कामकाज करू इच्छिते याविषयी कुतूहल चाळवले गेले आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार अधिवेशन शुक्रवारीच समाप्त होणार होते. मात्र, ते एक दिवसाने वाढवण्यात आले आहे.