याबाबत पोलिस ठाण्यातील जबाबात म्हटले आहे की, प्रा. पाठक हे १५ वर्षांपासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. ते बायोमेट्रिक प्रणालीत हजेरी नोंदवत नाहीत, वरिष्ठांचा आदेश मानत नाहीत. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गतवर्षी संस्थेने त्यांना १२० दिवसांसाठी निलंबित केले होते. निलंबनानंतर २३ जूनपासून ते सेवेत आहेत. त्यांची संस्थानिहाय चौकशी सुरू आहे. या कारणावरून ते प्राचार्य डाॅ. ताम्हनकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत होते. तसेच, प्रा. पाठक यांनी त्यांच्याविरुद्ध मानसिक छळाबाबत पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. तेव्हा पोलिसांनी त्यांना शांतता भंग न करण्याबाबत समज दिली होती.
३० जानेवारी रोजी प्राचार्य डाॅ. ताम्हनकर यांच्या केबिनमध्ये सहकारी प्राध्यापकांची बैठक सुरू होती. तेव्हा प्रा. पाठक सायंकाळी तेथे काठी घेऊन आले. त्यांनी शिवीगाळ करत काठी उगारून प्राचार्यांकडे धाव घेतली. तेव्हा शिपाई व प्राध्यापकांनी त्यांना अडवत बाहेर नेले. तेथून पुन्हा आतमध्ये येत प्राचार्यांच्या खुर्चीला लाथ मारून टेबलावरील काच काठीने फोडली. प्राचार्य ताम्हनकर यांना जिवे मारण्याची धमकी देत ते बाहेर गेले.
त्यानंतर त्यांच्या मोटारीवर (क्रमांक एमएच १०, सीए १६१५) काठीने मारण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. तेव्हा जवळ पडलेला दगड मारून काच फोडली. सुरक्षा रक्षकांनाही शिवीगाळ करत तेथून निघाले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्राचार्य डॉ. ताम्हनकर यांनी प्रा. पाठक यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयात न जाण्याचा पवित्रा घेतल्याचे सांगितले.