सांगली समाचार - दि. १६|०२|२०२४
सांगली : मान्सून आणि परतीचा पाऊस न झाल्यामुळे रब्बीज्वारीच्यापेरणी क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी एक लाख २६ हजार ६६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख चार हजार ६०१ हेक्टर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. जवळपास १७ टक्के पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे ज्वारीचे भाव भविष्यात तेजीत असतील, असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, खानापूर, तासगाव तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची उत्पादकतेत घट होणार आहे. सध्या मार्केट यार्डातही आवक घटली आहे. तरीही नवीन आवक सुरू झाल्याने सध्या चार हजार १२५ ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
एक लाख हेक्टरवर उन्हाळी ज्वारी
जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी एक लाख २६ हजार ६६ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख चार हजार ६०१ हेक्टर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात १७ टक्के क्षेत्र घटले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्क्याने पेरा घटला
जिल्ह्यात रब्बी ज्वारीची १०० टक्के पेरणी झाली होती. पण, यावर्षी मान्सून आणि उन्हाळी पाऊसच झाला नसल्यामुळे केवळ ८३ टक्केच पेरणी झाली आहे. जवळपास १७ टक्क्यांनी पेरणी क्षेत्र घटले आहे.
पाच हजारांचा भाव
ज्वारीला सध्या चार हजार १२५ ते पाच हजार रुपये विचेटलचा दर मिळत आहे. ज्वारीची काढणी सुरू झाल्यामुळे आवक वाढली आहे. यामुळे सध्या ज्वारीचे दर स्थिर आहेत. मात्र यंदा पेरा घटल्याने दर कडाडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल.
भाव स्थिरच असणार
जिल्ह्यासह सोलापूर, बीड, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातील विजापूर, अथणी परिसरात ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. ज्वारीची आवक वाढणार असल्यामुळे काही दिवस ज्वारीचे दर स्थिर असणार आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
ज्वारीला मिळणाऱ्या दरातून शेती परवडत नाही. म्हणून शासनाने ज्वारीचा हमीभाव सात हजारांवर ठेवला पाहिजे, तरच ज्वारीची शेती परवडणार आहे. उत्पादन खर्चाचा विचार केल्यास ज्वारीची शेती परवडत नाही. म्हणून शेतकरी भाजीपाला, ऊस पिकाकडे वळला आहे. ही बाब गंभीर आहे. सरकारची जर अशी उदासिनता राहिली तर भविष्यात अन्नधान्याचा प्रश्न उभा राहिल. - महेश चव्हाण, शेतकरी
अधिक वाचा:गुणवत्तेच्या ज्वारी उत्पादनात आमचा नाद करायचा नाही; ज्वारीचा सोलापुरी पॅटर्न