yuva MAharashtra मराठा आरक्षणावर भुजबळांचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणावर भुजबळांचं मोठं वक्तव्य

 



सांगली समाचार  - दि. १५|०२|२०२४

मुंबई  - मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी काढलेल्या अधिसूचनेच्या अमंलबजावणीसाठी विशेष अधिवेशन तातडीनं घेऊन त्यात कायदा पारित करावा यासाठी मनोज जरांगे १० तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाबाबत न्यायालयानही विचारपूस केली आहे. 

यादरम्यान ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या या आंदोलनावर भाष्य केलं आहे.  एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भुजबळ म्हणाले की, एकच दिवसाचं अधिवेशन असेल आणि एकाच दिवसात ते मार्गी लागेल. कारण कोणी विरोध करेल असं वाटत नाही. भाषण करतील पण विरोध कोणी करणार नाही. कारण सर्वांची मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसीमधून नाही. तर वेगळं आरक्षण मराठ्यांना द्या हा तो प्रस्ताव आहे, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. ते शक्यच नाही. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीमधून आरक्षण नाकारलं आहे. 



त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आहे. काँग्रेसच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला गेला पण तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेला कायदा हायकोर्टात टीकला पण सर्वोच्च न्यायालयात टीकला नाही. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्यांनी नेमला. क्युरेटीव्ह पेटीशनसाठी तीन न्यायाधीश बसले आहेत. हे सगळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल यासाठीच बसले आहेत. याला आमचा पाठिंबा आहेच, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.