सांगली समाचार - दि. १३|०२|२०२४
मुंबई - शरद पवारांशी पंगा घेऊन अजित पवारांनी चिन्ह-झेंड्यासह राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरू झाले खरे. पण त्याचबरोबर एकमेकांत असलेले हेवेदावे आणि घटबाजीचेही इनकमिंग झाल्याचे दिसून येत आहे.
परवा अजित पवारांचे होमगार्ड असलेल्या बारामती याची झलक पहावयास मिळाली. अजित पवारांच्या मतदार संघातील जबाबदारी सांभाळणाऱ्या विश्वासू शिलेदारावर, पक्षात आलेल्या बारामतीतीलच दुस-या एका वजनदार नेत्याने, बारामती तुमची जहागिरी असल्यासारखे वागू नका. अशी तोफ डागली. तेव्हा वरील नेत्याने तुमची अंडरवर्ल्ड बाहेर काढायला लावू नका, असा सज्जड दम भरला. ही बाब अजित पवारांनी दोन्ही नेत्यांना आपल्या नेहमीच्या भाषेत समज दिली.
असाच प्रकार मिरजेत घडल्याचे सर्वांना आठवत असेल सांगली-मिरजेचे विद्यार्थ्याचे सख्य सर्वज्ञात आहे. सध्या (अजित पवार गटाच्या) राष्ट्रवादीचा सुकाणू सांगलीकर हाती आहे. पक्ष, चिन्ह व झेंडा अजित पवारांच्या हाती आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ साखर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना, एका कार्यकर्त्याने शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्याच्या अरेरावीला कंटाळून आम्ही इकडे आलो आहे. सांगलीने मिरजकरांना नेहमीच सापत्न भावनेची वागणूक दिली आहे. आता तरी इथे आम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल का ? असा सवाल केला.
असेच अनेक प्रसंग अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतही वेगळे नाही आणि या सा-यांची गोळाबेरीज करणा-या भाजपातही सारे काही आलबेल आहे असे नाही.
त्यामुळेच दगाफटक्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत कोण कुणाच्या पायात पाय घालतो आणि कोण कुणाचा पतंग काढतो, तसेच या निवडणुकीत निष्ठावंताची झूल पांघरलेल्या घरभेद्यांना या पक्षाचे नेते कसे वेसन घालतात, यावरच सारे काही अवलंबून आहे.