मुंबई - आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी असलेल्या शिंदे आणि भाजप यांच्यातील या रक्तरंजीत संघर्षामुळे पुढील काळात राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता दिसून येत आहे.
उल्हासनगर शहरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या.
एकीकडे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्रित लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगितले जात असले तरी अजूनही तेथे कुरबुर सुरूच आहे. या मतदारसंघासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत काम न करण्याचा ठराव देखील स्थानिक भाजपने केला होता. शिंदे पिता-पुत्रांकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता.
एकंदरीत आगामी लोकसभा व पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद कसा संपवणार ? की केवळ मलमपट्टी करून भाजप-शिंदे गट निवडणुकीला सामोरे जाणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.